Pune News : 10 टक्के व्याजाने कर्जवसुली, मुद्दल देऊनही आणखी पैशाची मागणी, सावकाराला अखेर बेड्या

एमपीसी न्यूज : 10 टक्के व्याजदराने कर्ज देऊन मुद्दलसकट वसुली केल्यानंतर आणखी पैशाची मागणी करणाऱ्या एका खासगी सावकाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. भरत बाबूलालजी उणेचा (वय 36, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.  दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उणेचा हा अवैधरित्या मासिक 10 टक्के व्याजदराने कर्ज देऊन त्यांचेकडून सुरक्षा ठेव स्वरूपात कर्जदाराच्या सहीचे कोरी चेक, कोरे स्टॅम्प पॅड व इतर महत्वाची कागदपत्रे घेत होता. कर्जदाराकडून मुद्दल व्याजसहित वसूल करून देखील दमदाटी, जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांची पिळवणूक करीत असल्याची तक्रार युनिट दोनला मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत होते.

तक्रारदाराने उणेचा याच्याकडून दोन वर्षापूर्वी 3 लाख रुपये 10 टक्के मासिक व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात तक्रारदाराकडून सहीचे 2 कोरे चेक, 1 कोरा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर लिहून घेतला होता. तक्रारदाराने मुद्दल तसेच व्याज देऊनही उणेचा हा आणखी अडीच लाख रुपये व्याज स्वरूपात मागत होता. पैसे न दिल्यास समाजात तुझी बदनामी करतो अशी धमकी तो देत होता, असे चौकशीतून समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.