Dehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कॉलेजवरून घरी येत असलेल्या तरुणीच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून, तिची वाट अडवून, तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला फोन करून शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुनीत प्रकाश जोगीन (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मंगळवारी (दि. 14) कॉलेजवरून घरी येत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. देहूरोड येथील सेंट्रल चौकात आली असता आरोपीने त्याची दुचाकी तरुणीच्या दुचाकीला आडवी लावून ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आरोपीने तरुणीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. फिर्यादीच्या व तिच्या आईच्या फोनवर वारंवार फोन केला. आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करून आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.