Talegaon Dabhade News : स्व. दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहा महसूली विभागात ‘लोकनाट्य व वग नाट्य’ प्रयोग आयोजित करा

विनोद सम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानची सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – राष्ट्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ लोककलावंत विनोद सम्राट दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी राज्याच्या सहा महसूल विभागात लोकनाट्य, तमाशा, वगनाट्य आणि लोककला जतन संवर्धनासाठी चर्चा सत्रे आयोजित करण्यात यावीत, अशी मागणी विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात गुरुवारी (दि. 26) विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांची भेट घेवून यासंबंधी विविध मागण्याचे निवेदन दिले.

या शिष्टमंडळात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रकाश खांडगे,उपाध्यक्ष प्रा डाॅ गणेश चदंणशिवे, संजय चव्हाण, सचिव प्रभाकर ओव्हाळ, कोषाध्यक्ष ॲड श्रीमती रंजना भोसले, विश्वस्त राजेंद्र सरोदे,ज्ञानेश महाराव, सोपान खुडे आणि खंडूराज गायकवाड यांचा समावेश होता.

“गाढवाचं लग्न” हे वगनाट्य स्व. दादू इंदूरीकर यांनी अजरामर केले. या वगनाट्याचे हजारो प्रयोग झाले, त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, जेष्ठ नेते शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी या वगनाट्याचे त्याकाळात भरभरून कौतुक केले.

अशा या महान लोकलावंतांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू झाला आहे, त्याचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक महसूली विभागात “गाढवाचं लग्न”या वग नाट्याचा प्रयोग करावा. त्याच प्रमाणे त्याअनुषंगाने लोककलेच्या इतिहासाला उजाळा मिळण्याकरिता परिसंवाद, चर्चा सत्रे याचे आयोजन करावे. अशा विविध मागण्याचे निवेदन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांना विनोद सम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.