Rahatani News : मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

सात जणांना अटक

एमपीसी न्यूज – मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून दहा वर्षे जेलमध्ये पाठवण्याच्या धमक्या देऊन 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हा प्रकार दहा सप्टेंबर रोजी रात्री रामनगर, रहाटणी येथे बालाजी ट्रेडर्स या दुकानात घडला.

हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तूद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योत्स्ना पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरजाराम रूपाराम चौधरी (वय 37, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रहाटणी येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. हे दुकान फिर्यादी यांचे भाऊ सांभाळतात. आरोपी हे कोथरूड पुणे येथील रहिवासी असून तेथे त्यांनी मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन नावाची संघटना सुरू केली असल्याचे आरोपी सांगतात.

10 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले. फिर्यादी यांच्या दुकानात असलेले चहा आणि इतर साहित्य बनावट आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानातून बनावट माल विकत आहेत. त्यामुळे फिर्यादी यांच्या भावाला दहा वर्षांसाठी जेलमध्ये पाठवण्याची आरोपींनी धमकी दिली. तसेच 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी धमकावून फिर्यादी यांच्या भावाच्या खिशात असलेले आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम आरोपींना देण्यास भाग पाडले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.