Dighi News : ‘त्या’ घटनास्थळी सापडले 30 बॉम्ब सदृश गोळे

एमपीसी न्यूज – वडमुखवाडी येथे अलंकापुरम रोडवर गाईच्या गोठ्यात शनिवारी (दि. 5) सकाळी बॉम्ब सदृश वस्तूचा स्फोट झाला. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. तर दोन मुले जखमी झाली. त्या घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता 30 बॉम्ब सदृश गोळे मिळाले आहेत.

प्रदीप मारेझोरे चव्हाण (वय 34), गरीबदास बली चव्हाण (वय 35, रा. विश्रांतवाडी रोड, दिघी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. राधा गोकुळ गवळी (वय 5) हिचा मृत्यू झाला आहे. आरती गोकुळ गवळी (वय 4), राजेश महेश गवळी (वय 4) हे दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई चेतन साळवे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुपारी एवढ्या आकाराची त्यावर धाग्याने गुंडाळलेली बॉम्ब सदृश वस्तू निष्काळजीपणे वापरली. आरोपींनी हयगयीने, जाणूनबुजून या बॉम्ब सदृश वस्तू उघड्यावर टाकून दिल्या. मयत मुलगी राधा तिची लहान बहीण आरती आणि चुलत भाऊ राजेश हे घराजवळ खेळत असताना त्यांना या बॉम्ब सदृश वस्तू आढळल्या. खेळण्याची वस्तू समजून राधाने ती वस्तू हातात घेतली. तिच्यावर दाब पडल्याने वस्तूचा भीषण स्फोट झाला. यात राधाचा मृत्यू झाला तर तिची लहान बहीण आणि चुलत भाऊ जखमी झाले.

या परिसरात हे बॉम्ब सदृश गोळे आले कुठून, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून काही घरांमध्ये शोधमोहीम राबवली. त्यात पोलिसांना तब्बल 30 बॉम्ब सदृश गोळे आढळून आले आहेत. हे गोळे डुकरे मारण्यासाठी वापरले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.