Pune News : जात, धर्माबाबत चुकीची वक्तव्य करु नयेत – शरद पवार

पक्षातील लोकांना दिला समज

एमपीसी न्यूज : ब्राम्हण समाजाच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वेळ घेवून प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणीही जात धर्माबाबत चुकीची वक्तव्य करु नयेत. आमच्या पक्षातील लोकांना याबाबत समज देण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हा समाज नाराज होता. त्यामुळे काही मंडळींनी  बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. या बैठकीला 14 संघटनांचे सुमारे 40 प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पवार म्हणाले, काही लोकांनी मला ब्राम्हण समाजाची बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे या बैठकीला राज्यातील अनेक भागातून प्रतिनिधी आले होते. माझ्या पक्षातील काही सहकार्यांच्या वक्तव्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. जात आणि धर्माविषयी कोणीही वक्तव्य करुन नयेत अशी समज या नेत्यांना देण्यात आली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

बैठकीमध्ये ब्राम्हण समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील हा वर्ग शहरी भागात येत आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत अधिक संधी हवी आहे. आम्ही केंद्र आणि राज्याची माहिती गोळा केली होती. त्यात नोकर्‍यांमध्ये त्यांची लोकसंख्येनुसार संख्या अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचे सूत्र बसणार नाही असे मी सांगितले अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

राज्यात विविध समाजांना मदत करण्यासाठी महामंडळ आहेत. तसे ब्राह्मण समाजासाठी परशूराम महामंडळ काढावे अशी त्यांची मागणी होती. तो प्रश्न राज्य सरकारचा आहे असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा वेळ, प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वसान त्यांनी यावेळी दिले.

यावेळी अखिल भारतील ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले, बैठकीमध्ये आमच्या समाजाच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी चुकीची वक्तव्य केली होती त्याला आमचे समर्थन नाही. यानंतर त्यांना समज देण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले. ब्राम्हण समाजासाठी महामंडळ निर्माण करण्याची मागणी यावेळी आम्ही केलेली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांसमोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्‍वासन आम्हाला देण्यात आले आहे. यावेळी मनोज कुलकर्णी आणि वसंतराव गाडगीळ यांनी सुध्दा बैठकीत सकारात्मक झाली असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.