Pimpri News : पॅनिक होऊ नका, लक्षणे दिसताच आयसोलेट व्हा अन् चाचणी करा – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता काळजी घ्यावी. कोरोना सदृश लक्षणे दिसताच स्वत:ला आयसोलेट करावे आणि तातडीने चाचणी करुन घ्यावी. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर लक्षणे नसल्यास ‘होम क्वारंटाईन’ व्हावे. घरीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन या रोगापासून बचाव करु शकतो, असा सल्ला महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला तसेच गंभीर रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी आज (शुक्रवारी) शहरवासीयांशी संवाद साधला. कोरोना, ओमायक्रॉन आणि लसीकरण याबाबत त्यांनी माहिती दिली. आयुक्त पाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीविरोधात लढाई चालू आहे. 15 दिवसांपूर्वी लढाई जिंकल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. पण, आता कोरोनाची तिसरी लाट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सर्वांनी मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सभा, समारंभ मोजक्या लोकांत करावेत.

ओमायक्रॉनची संसर्ग करण्याची क्षमता डेल्टाच्या तुलनेत 30 पट अधिक आहे. त्यामुळे त्याचा खूप झपाट्याने संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दररोच्या दिनचर्येत बदल करणे गरजेचे आहे. या लाटेपासून स्वत:चा बचाव करायचा असेल. तर, लसीकरण महत्त्वाचे आहे. सर्वांनी लस घ्यावी.

व्याधी असेल, लस घेतली नसल्यास या व्हायरसमुळे रुग्णाची प्रकृती खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीचा लाभ घ्यावा. चालढकल करणे अंगाशी येईल. रुग्णालयात दाखल झालेल्या 82 टक्के लोकांनी कोणत्याही प्रकारचे लसीकरण केले नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

ओमायक्रॉनची लागण झाल्यास रुग्णांची संख्या वाढणार आहे. इतरांना संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कोरोना सदृश लक्षणे असल्यास तत्काळ आयसोलेट व्हावे. रिपोर्ट येण्यापर्यंत वाट बघत बसल्यास इतरांना धोका निर्माण होईल. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर लक्षणे नसल्यास होम क्वारंटाईन व्हावे.

पॅनिक न होता घरीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन या रोगापासून बचाव करु शकतो. पॅनिक होऊ नका, लक्षणे दिसताच चाचणी करा. क्वारंटाईन झाल्यानंतर आपली कंडीशन मॉनिटर करणे गरजेचे आहे. होम क्वारंटाईन असताना सहा मिनिटांची वॉक टेस्ट दिवसातून दोनवेळा करावी. ऑक्सिजन पातळीवरील फरक लक्षात घ्यावा. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन ते चार दिवस जास्तीची काळजी घ्यावी. असे केल्यास धोका टळू शकेल. आपल्यापासून दुस-याला कोरोना होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

महापालिका सज्ज!

महापालिका सर्व यंत्रणा तयार करत आहे. अॅटो क्लस्टर, जम्बो, वायसीएम रुग्णालय सज्ज ठेवले आहे. गरज पडेल तशी वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा. सर्वांनी लसीकरण करावे. महापालिकेने लस न घेणा-यांना हॉटेल, दुकान, ऑफीस, कंपनीत कामासाठी दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले.

वाढता संसर्ग रोखायचा असेल पुढचे निर्बंध टाळायचे असतील तर काळजी घ्यावी लागेल. गंभीर रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. डेडीकेटेड हेल्पलाईन सुरु केली. कॉल सेंटर सुरु केले. होम क्वारंटाईन व्यक्तीशी दररोज संभाषण करुन समुहपदेशन केले जाणार आहे. कोरोनाच्या फैलावा विरोधात एकत्र लढूया, सर्वांनी सहकार्य करावे. कोरोनाचा प्रचार, प्रसार यामुळे आणि यामुळे होणारी हानी आपण टाळू शकतो, असेही आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.