Wakad Crime News : पोलीस असल्याची बतावणी करून पळवला मोबाईल आणि दुचाकी

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी एका व्यक्तीला दुचाकीचे लायसन्स दाखवण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन हिसकावून दुचाकी सोबत त्याला पोलीस ठाण्यात आणण्याचे नाटक केले. रस्त्यात त्याच्याकडे तोडपाणी म्हणून तीन हजारांची मागणी केली. एवढे पैसे देण्यास नकार दिल्याने व्यक्तीला रस्त्यात उतरवून पोलीस ठाण्यातून दुचाकी आणि मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे व्यक्तीच्या निदर्शनास आले. हा प्रकार मंगळवारी (दि. 26) मध्यरात्री एक वाजता डांगे चौकाकडे जाणा-या रस्त्यावर शेल पेट्रोल पंपाजवळ वाकड येथे घडला.

मयूर अरुण सरडे (वय 32, रा. लोहगाव, पुणे) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 28) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री एक वाजता फिर्यादी डांगे चौकाकडे जाणा-या रस्त्यावर शेल पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम मयूर यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून ‘आमच्या गाडीला लाथ मारून आला का’ असे म्हणून मयूर यांच्याकडे लायसन्स मागितले. मयूर यांनी त्यांच्या मित्राला फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता आरोपींनी ‘पोलीस स्टेशनला गेल्यावर कोणाला फोन करायचा. आता आमच्यासोबत चल’ असे म्हणून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला.

एकाने मयूर यांची दुचाकी घेतली आणि त्यांना मागे बसवून पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचा बनाव केला. रस्त्यात ‘आम्हाला तीन हजार रुपये दे. तुला सोडून देतो’ असे म्हणून आरोपींनी तोडपाणी करण्याचा प्रयत्न केला. मयूर यांनी एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना रस्त्यात उतरवले आणि चालत वाकड पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात येऊन दुचाकी आणि मोबाईल फोन घेऊन जा असे सांगून आरोपींनी मयूर यांची 40 हजारांची दुचाकी आणि 15 हजारांचा मोबाईल फोन नेला. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.