Chakan Crime News : नागेश कराळे खून प्रकरणी मुख्य आरोपी योगेश दौंडकर सह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील नागेश कराळे खून प्रकरणी चाकण पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश दौंडकर सह चौघांना अटक केली आहे. नागेश कराळे हत्याप्रकरणात वापरण्यात आलेली मोटार कार पोलिसांनी मागील आठवड्यात नगर मधून ताब्यात घेतली होती, मात्र मुख्य सुत्रधार योगेश बाजीराव दौंडकर व अन्य साथीदार  फरार होते. दरम्यान पोलीस त्यांचा शोध घेत होते.

योगेश बाजीराव दौंडकर (वय 38, रा. शेलपिंपळगाव), लक्ष्मण बाबुराव धोत्रे (वय 34 , रा. शेलपिंपळगाव), ओंकार भालचंद्र भिंगारे (वय 22, मूळ रा. मुळशी, सध्या रा. पिंपळे गुरव सांगवी, पुणे), फिरोज कचरू सय्यद (वय 24 रा. बोरी पारधी, दौंड , पुणे) अशी गुरुवारी (दि.६ ) रात्री पावणेबारा च्या सुमारास अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यापूर्वी शिवशांत गायकवाड, सोपान नामदेव दौंडकर (दोघे रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांना अटक करण्यात आली होती.

शेलपिंपळगाव येथे गुरुवारी (दि. 23 डिसें) रात्री नागेश कराळे आपल्या जीपमध्ये बसणार तेवढ्यात कारमधून आलेल्या तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्यावर पिस्तूलातून आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी गिरीश बाळासाहेब कराळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार योगेश दौंडकर व त्याच्या अन्य साथीदारांवर चाकण पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अनेकांची चौकशी केली होती. दरम्यान शिवशांत गायकवाड यास आणि सोपान नामदेव दौंडकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे सुरुवातीलाच कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर मुख्य हल्लेखोर असलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काही जणांना अटक केल्यानंतर यातील मुख्य आरोपी  योगेश दौंडकर सह गुन्ह्यातील हल्लेखोर स्वतःहून गुरुवारी रात्री चाकण पोलीस ठाण्यात हजर झाले. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे हे अधिक तपास करत आहेत.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी योगेश दौंडकर याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर पिस्तुल बाळगणे, विक्री करणे या प्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस कारवाईत त्याकडे मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे मिळून आल्याच्या घटना घडल्या होत्या.

दरम्यान पोलिसांनी कराळे खून प्रकरणी अनेकांची चौकशी केलेली आहे. यातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आल्याने या घटनेत आणखी नेमका काय उलगडा होतो याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या चौघांना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.