Pimple Saudagar News : फ्लॅटची उर्वरित रक्कम न देता वीज मीटर नावावर करून घेत फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅट खरेदी केल्याची उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगून फ्लॅटचा ताबा घेतला व खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवला. संबधित फ्लॅटचा वीज मिटर मूळ मालकाच्या नावाने असताना त्यांची खोटी सही घेऊन वीज मिटर नावाने करून घेतला तसेच फ्लॅटचे उर्वरित पैसे देखील न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर 2018 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत राधाई नगरी बिल्डींग बांधकाम साईट, पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली.

दिलीप बापूसाहेब गायकवाड (वय 61, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.14) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निकिता अरुण उत्तरकर व अरूण रामचंद्र उत्तरकर ( दोघेही रा. खडकी, पुणे) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांनी आपल्या जागेत राधाई नगरी हा गृहप्रकल्प उभारला  व त्यातील फ्लॅट विक्रीला काढले. त्यातील एक फ्लॅट उत्तरकर दाम्पत्याने खरेदी केला. फ्लॅटचे काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगितले.

फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर आरोपी यांनी त्यात भाडेकरू ठेवला. फ्लॅटचा वीज मीटर फिर्यादी यांच्या नावे असताना आरोपींनी फिर्यादी व सोसायटीचा ना हरकत दाखला न घेता फिर्यादी यांची खोटी सही करून बनावट कागदपत्राच्या मदतीने वीज मिटर आपल्या नावे करून घेतला. तसेच फ्लॅटचे उर्वरित पैसे दिले नाहित असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.