Maval News : किनारा वृद्धाश्रमात मकरसंक्रांत उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – अहिरवडे कामशेत येथे असलेल्या किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टमध्ये आजी आजोबांनी मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला. रक्ताच्या नात्यापासून दूर असलेल्या या वृद्धांनी एकमेकांना तिळगुळ आणि शुभेच्छा देत उरले सुरले आयुष्य गोड करण्याचे वचन दिले.

शोध मोहीम अंतर्गत रस्त्यावर सापडलेले आजी आजोबा या आश्रमात घेतले जातात. मागील 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या संस्थेला शासनाची मदत मिळत नसून देणगीदारांच्या आशीर्वादाने या संस्थेतील 62 वृद्धांचा उदरनिर्वाह सुरू आहे, अशी माहिती संचालिका प्रिती वैद्य यांनी दिली.

आजचा दिवस काही खासच ठरला. सकाळी सकाळीच सर्व आजी आजोबांची मकर संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरु झाली. तिळगुळाचे लाडू, वड्या व विशेष आकर्षण पतंगांचे होते.आवड असणा-या व नसणा-या आज्जींनी देखील आज साड्या नेसण्याचा आग्रह धरला. गळ्यात माळा घातल्या. आजोबांचा तर थाट काही औरच! आज सर्व आजोबातर हिरोच दिसत होते.

पतंग उडवण्याची तयारी सुरु झाली. पतंगीवर काही आजोबांनी “किनाराचे” नाव  लिहीले. सर्वजण बाहेर  पटांगणात जमा झाले.पतंग जशी ऊंच ऊंच जात जात होती तसा सर्व आजी आजोबांचा उत्साह देखील वाढत होता.

काही आजींचे तिळगुळ घ्या!गोड गोड बोला हे बोबडे व गोड बोल ऐकत रहावेसे वाटले. ऐकू व बोलू न शकणा-या मालू आजींनी त्यांच्या सुंदर हास्याने शुभेच्छा दिल्या.

जगापासून अनेक वर्षे लांब रहाणा-या आजी आजोबांना “किनारा”ह्या एकत्र कुटूंबात आता एकटे वाटत नाही. त्यांच्या चेह-यावरचे हास्य एकमेकांना  पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकवतं! अशा या “किनारा परिवारातर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट, अहिरवडे – कामशेत ही संस्था गेली 12 वर्षे काम करते आहे. आजी आजोबा असे 62 मेंबर आहेत. शोध मोहीम अंतर्गत रस्त्यावर सापडलेले आजी आजोबा सुद्धा या आश्रमात घेतले जातात.शासनाकडून अजिबात निधी मिळत नाही.

येथे आजी आजोबांची मोफत देखभाल केली जाते. देणगीदारांवरच ही संस्था अवलंबून आहे. ह्या संस्थेच्या संचालिका प्रिती वैद्य असून आश्रमाचे व्यवस्थापक म्हणून उमेश शक्करवार हे काम पाहतात, काळजीवाहक म्हणून सोनी गोपाल, अश्विनी रणखांबे काम करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.