Alandi News : गणेश मंडळांनी सामाजिक,समाजोपयोगी उपक्रम राबवावेत – पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चाकण विभाग अंतर्गत आळंदी, दिघी, चाकण, महाळुंगे पोलीस स्टेशन, गणेश उत्सवानिमित्त गणेश मंडळांची बैठक आळंदी येथील रसिकलाल धारीवाल सभागृहात (फ्रुटवाले धर्मशाळा) आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस शहरातील व ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान आळंदी, शेलू,पाईट येथील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. आळंदी शहरातील नव्याने तयार झालेले  रस्ते हे उंच झाले असून मिरवणुकी दरम्यान हजेरी मारुती चौक, महाद्वार चौक,गावठाण परिसर येथे वीजेच्या तारांचा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी उपाय योजना करावी.

शहरातील गणेशोत्सव मंडळांना परवान्यासाठी नगरपरिषद प्रत्येक पोलिस ठाण्यांचे हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी,अशी मागणी आनंदराव मुंगसे यांनी केली. शेलू व पाईटमधील पदाधिकाऱ्यांनी सूचना करते वेळी सांगितले की, ग्रामीण भागात कसल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरीता गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी विजेची पुरेशी व्यवस्था व्हावी. विसर्जनावेळी कमी खोलीच्या पाण्याच्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन व्हावे.

डी. डी. भोसले म्हणाले नदी पलीकडील एस. टी. स्टँडच्या मोकळ्या जागेत दोन मोठे पाण्याचे हौद करून पलीकडील विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गणेश मूर्तींचे तिथे विसर्जन करावे.तसेच वडगांव रस्ता, चऱ्होली रस्त्यावरील चार नंबर शाळा येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी  पाण्याच्या हौदाची व्यवस्था करावी.

नगरपालिका आधिकारी व वीज मंडळ अधिकारी या बैठकीत अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर  त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध व्यक्त  केला.यावेळी सहा.आयुक्त (चाकण आयुक्त) प्रेरणा कट्टे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता.यंदा मात्र शासन नियम, अटी पालन करत गणेश मंडळे उत्साहात सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार आहेत. नगरपरिषद,पोलीस स्टेशन,वीज मंडळाची योग्य ती परवानगी घेणे आवश्यक आहे.

मिरवणुकीला वापर करण्यात येणारी वाहने रजिस्टर आहे का ते तपासावे.गणेश मूर्ती देखभालीसाठी  दिवस रात्र ठराविक वेळ ठरवून स्वयंसेवक नेमावेत. गणेश मंडळाच्या ठिकाणी जुगार खेळू नये.तसे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. राजकिय,धार्मिक वाद होतील असे देखावे करू नयेत. सामाजिक व चांगले उपक्रम करणाऱ्या तसेच शिस्त व वेळेचे पालन करणाऱ्या मंडळांना बक्षिसे देणार आहोत. कर्णकर्कश आवाजात  ध्वनी प्रदूषण  करू नये. डिजे वाजविण्यासाठी कोणीही आग्रह करु नये, तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात यावी.

पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर म्हणाले,आपल्या सहकार्यातून व विश्वासातून हा उत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या काळात मानवी जीव वाचवणे महत्वाचे असल्याने काही निर्बंध आले होते. यावेळी कोरोना आहे परंतु त्यावर उपाययोजना करत मर्यादित स्वरूपात तो आहे. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव हा सार्वजनिक ठिकाणी शासनाने दिलेले नियम अटींचे पालन करत उत्साहात साजरा करणार आहोत. गणेशोत्सवात आपण मानवी मूल्ये जपावीत.

गणेश उत्सवात सामाजिक, समाज उपयोगी उपक्रम राबवावेत.गणेश दर्शनासाठी तसेच देखावे  पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षतेसाठी स्वयंसेवक ठेवावेत.शक्यतो गैरप्रकार घडू नये यासाठी सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवावेत. समाजास प्रबोधन करणारे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे.गणेश ही बुद्धीची देवता असून ती अग्रगण्य देवता आहे. तसेच ती विघ्नहर्ता देवता आहे. हा उत्सव आनंदात शांततेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत निर्विघ्नपणे पार पडेल.

यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील,पो. नाईक मच्छिंद्र शेंडे, दिलीप शिंदे व कालिदास वाडेकर,सागर बोरुंदीया तसेच शहरातील,ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी केले. समारोपाचे भाषण चाकण पो.आधिकारी वैभव शिनगारे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.