Pune News : रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या सराईतांना हटकल्याने पोलिसांच्या दिशेने वीट भिरकावली

एमपीसी न्यूज : सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केल्याचा प्रकाराला 24 तास होत नाहीत तोवर आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला सराईत गुन्हेगारांनी शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने विटा भिरकावल्या आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पापळ वस्ती येथे 4 मे च्या मध्यरात्री हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पोलिस शिपाई अमोल निवृत्ती नवले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल तानाजी ढावरे (वय 20), सनी संतोष भरगुडे (वय 20) आणि त्यांच्या दोन साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 4 मे च्या मध्यरात्री आरोपी पापळ वस्ती परिसरात गोंधळ घालत असताना फिर्यादी अमोल नवले यांनी तेथे जाऊन त्यांना विचारणा केली. यावरून आरोपी सनी भरगुडे याने फिर्यादी यांच्या दिशेने वीट भिरकावून शिवीगाळ केली. तसेच आरोपी अमोल ढावरे याने फिर्यादी यांच्याशी झटापट करून शिवीगाळ केली आणि ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपी अमोल ढावरे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.