Hinjawadi Crime News : हिंजवडीत साडीचे दुकान फोडण्याचा तर भोसरीत क्रेनच्या साहाय्याने ट्रक चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – हिंजवडी वाकड रोडवर असलेले एक साडीचे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकाने शिट्टी वाजवून त्यांना पिटाळून लावले. तर भोसरी मधील धावडेवस्ती येथे दोन चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने एक ट्रक चोरण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणी शनिवारी (दि. 23) हिंजवडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 43 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हिंजवडी वाकड रोडवर साडीचे दुकान आहे. गुरुवारी (दि. 21) पहाटे सहा वाजता अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकाने शिट्टी बजावल्याने चोरटे पळून गेले. फिर्यादी दिवाळी सणासाठी सुरत येथे खरेदी करण्यासाठी गेल्या असताना दुकानाच्या मॅनेजरने त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शनिवारी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकनाथ सुदाम जाधव (वय 38, रा. गजानननगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल जिलानी सय्यद (वय 29, रा. बालाजीनगर, भोसरी एमआयडीसी), राहुल बाळासाहेब साळुंके (वय 31, रा. महात्मा फुले नगर, भोसरी एमआयडीसी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांचा आयशर कंपनीचा ट्रक आरोपींनी थेट क्रेनच्या साहाय्याने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.