PCMC News : ठेकेदाराकडून बेकायदेशीरपणे 23 झाडांची कत्तल अन् पालिकेकडून केवळ ‘एनसी’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांना पाठिशी घालण्याचे काम प्रशासकीय राजवटीत जोरात सुरु असल्याचे दिसते. (PCMC News) चिंचवड, मोहननगर येथील महात्मा फुले उद्यानातील सुमारे 23 मोठ्या झाडांची ठेकेदाराने  बेकायदेशीपरणे कत्तल केली असतानाही उद्यान विभागाने ठेकेदारावर केवळ अदखलपात्र (एनसी) दाखल केली. त्यामुळे अधिकारी कोणाला वाचवत, पाठिशी घालत आहेत? यात काही  काळेबेरे आहे का? अधिकारी आणि  ठेकेदारांचे आर्थिक लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

महापालिकेने केवळ 1 सुबाभुळ तोडण्याची परवानगी दिली होती. पण, ठेकेदाराने बेकायदेशीरपणे तब्बल 23 मोठ्या झाडांची कत्तल केली. त्यामध्ये फायकस 14, पेल्टाफोरम 6, चिंच 1, सुबाभुळ 1, वड 1 अशा एकूण 23 झाडांची कत्तल करण्यात आली. 23 झाडांची कत्तल होवूनही उद्यान विभागाने केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. भरत रामभाऊ पारखी रा. सुसगाव, मुळशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इशार जफर शा (रा. बौध्दनगर, सेक्टर 22, निगडी) या ठेकेदाराविरुध्द पिंपरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वृक्षप्रेमींकडून पालिकेच्या ठेकेदाराला पाठिशी घालण्याच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Alandi : आळंदीमध्ये हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे.(PCMC News) परंतु, उद्यान विभागाकडून 1 ते 2 झाडे तोडण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. ही वृक्षतोड उद्यान विभागाच्या आर्शिवादानेच होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने केला जातो. मोहननगर येथील महात्मा फुले उद्यानातील बेकायदेशीरपणे वृक्षतोडणा-यांवर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या उद्यान विभागाच्या भूमिकेमुळे पर्यावरण प्रेमींच्या आरोपाला पुष्टी मिळते.  23 झाडांची कत्तल महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याची सर्वत्र चर्चा आहे.

यापूर्वी महापालिकेच्या नेहरुनगर हॉकी स्टेडियम येथील वृक्षांची वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि चार वृक्षांची बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत   महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरनेच तोड केली होती. लाकडे गायब केल्याचे समोर आले होते. या सुपरवाझरला निलंबित करुन त्याची चौकशी सुरु केली. पण, गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे उद्यान विभागाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची दुटप्पी भूमिका!

जुलै महिन्यात आकुर्डीतील मे. फॉरमायका कंपनीने बेकायदेशीरपणे 90 वृक्ष तोडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेने कंपनीला नोटीस पाठविली. प्रत्येक वृक्षामागे 50 हजार रूपये दंड याप्रमाणे कंपनीकडून एकूण 45 लाख रूपये दंड वसूल केला. त्याचप्रमाणे चिंचवड, मोहननगर येथील महात्मा फुले उद्यानातील सुमारे 23 मोठ्या झाडांची बेकायदेशीपरणे कत्तल करणा-या ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही?, दंडात्मक कारवाईची नोटीस का पाठविली नाही? केवळ अदखलपात्रच गुन्हा का दाखल केला? महापालिका अधिकारी कोणाला पाठिशी घालत आहेत? यात आर्थिक देवाण-घेवाण झाली का? अधिका-यांच्या आर्शिवादानेच वृक्षतोड झाली का? असे विविध सवाल उपस्थित होत आहेत.   उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची दुटप्पी भूमिकाही समोर आले आहे. त्यांच्या कार्यशैलीबाबतही वृक्षप्रेमींकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील म्हणाले, वृक्षतोडीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दखलपात्र करण्याबाबत उद्यान विभागाला सूचना दिल्या आहेत.(PCMC News) या वृक्षतोडीबाबत कर्मचा-यांना नोटीस काढली आहे. त्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.