India Vs South Africa 3rd Test Day1 : तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी केली हाराकरी, 223 धावात गारद झाले रथी महारथी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – मालिकेतल्या निर्णायक कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बलाढ्य भारतीय फलंदाजांनी केलेल्या ढिसाळ आणि आत्मघाती फलंदाजीमुळे भारताच्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले. कर्णधार कोहलीची एकाकी झुंज आणि त्याला काही प्रमाणात मिळालेल्या पुजाराच्या साथीने आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या पहिल्या डावात सर्व गडी बाद 223 धावा झाल्या होत्या.

केपटाऊनच्या न्यूलँड मैदानावर इतिहास जरी भारतीय संघाच्या विरोधात असला तरीही तो बदलण्याची मनःशक्ती आणि धमक मनात घेवून आणि ठेवून निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरला आहे,त्यात कितपत यश मिळेल हे येत्या चार पाच दिवसात नक्कीच कळेल, मात्र आजच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 223 धावा केल्या आहेत, तर याला उत्तर देताना यजमान संघाने एक गडी गमावून 17 धावा केल्या आहेत.

पहिली कसोटी दणदणीत जिंकून मिशन आफ्रिकेची चांगली सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच नियमित कर्णधार विराट कोहली पाठदुखीमुळे संघाबाहेर गेला होता, मात्र अंत भला तो सब भला या उक्तीनुसार विराट तिसऱ्या आणि मालिकेतल्या निर्णायक कसोटीसाठी तंदुरुस्त होऊन संघात बाहेर आला. त्याच्या फिट होण्याने कुऱ्हाड पडली ती नवख्या हनुमा विहारीवर. दुसरा बदल झाला तो दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्यामोहम्मद सिराजच्या जागी अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेल्या उमेश यादवचा,दक्षिण आफ्रिका संघाने मात्र आपल्या दुसऱ्या कसोटीतल्या विजयी संघात काहीही बदल न करणेच योग्य समजले.

कोहलीने आपल्या 99व्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,मात्र या अंतिम आणि निर्णायक कसोटी सामन्यात या मालिकेत चांगल्याच भरात असलेल्या राहुल आणि त्याचा जोडीदार मयंक आगरवालला चांगली सलामी मिळवून देता आली नाही, राहुल 12 धावा करून ओलीवीरची शिकार ठरला तर मयंक 15 धावा करून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.दोघेही बऱ्यापैकी खेळत आहेत असे वाटत असतानाच बाद झाल्याने भारतीय संघाला दोन मोठे धक्के मिळाले.

रोहीत शर्मा आणि शुभमन गीलच्या अनुपस्थित पुन्हा एकदा अंतिम अकरा मध्ये स्थान मिळालेल्या मयंकला भारतातील कसोटीत करता आलेल्या चांगल्या कामगिरीची इथे मात्र पुनरावृत्ती करता आली नाही, त्यामुळे त्याची प्रतिमा घर मे शेर बाहेर ढेर अशी होतेय हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.तुलनेत राहुलने मात्र या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे,मात्र हे दोघेही या महत्वपुर्ण सामन्यात किमान पहिल्या डावात तरी चांगलेच अपयशी ठरले,हे कटू पण सत्य आहे. त्यामुळे भारतीय संघाची पहिली विकेट पडली तेव्हा 1 बाद 31 तर आणखीन दोनच धावा वाढल्या असताना मयंक आगरवालही बाद झाल्यामुळे भारतीय संघाची अवस्था दोन बाद 33 अशी कठीण झाली होती.

दोन बाद 33 नंतर अनुभवी पुजारा आणि कर्णधार कोहली यांची जोडी एकत्र आली. दोघेही आपला अनुभव आणि सर्वस्व पणाला लावून खेळत होते. उपहारापर्यंत दोघांनीही आपली विकेट सांभाळून ठेवत संघाला दोन बाद 75 अशी चांगली धावसंख्या गाठून दिली होती. उपहारानंतरही यांच्याकडून अशीच भागिदारीची अपेक्षा होतीच, त्यावर बऱ्यापैकी खरे उतरत 63 धावांची चांगली भागीदारी झाली असताना चेतेश्वर पुजारा वैयक्तिक 43 धावा काढून मार्को यांसेनच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देवून बाद झाला,पुजारा चांगलाच स्थिरावला होता.

आतापर्यंतच्या अनुभवावरुन तो एकदा स्थिर झाला की आपल्याला एक मोठी खेळी दाखवतो ,मात्र आजही तो आशा दाखवून सर्वानाच निराश करून गेला.पुजाराचे सातत्याने अपयशी ठरणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. श्रेयस अय्यर,सुर्यकुमार ,हनुमा विहारी ,पुण्याचा ऋतुराज असे नवोदित चांगली कामगिरी करुन दाखवण्यासाठी उत्सुक असताना संघ व्यवस्थापन मात्र रहाणे आणि पुजाराच्या अनुभवाला प्राधान्य देत आहे,त्यात या जोडीचे सततचे अपयश भारतीय संघाला त्रासदायक ठरते आहे, इतके नक्की!

पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या रहाणेने सुरुवात तरी आक्रमक केली मात्र त्याची ही आक्रमकता क्षणिकचीच ठरली आणि रहाणे सुद्धा पुन्हा एकदा अपयशीच ठरला,आपली पन्नासावी कसोटी खेळणाऱ्या रबाडाने रहाणेची खेळी फुलण्याआधीच उध्वस्त केली,रहाणेने फक्त 9 धावा काढल्या. यामुळे भारतीय संघाची अवस्था चार बाद 116 अशी कठीण झाली.

त्याच्या नंतर फलंदाजीसाठी आला तो ऋषभ पंत,दुसऱ्या बाजूने कोहली आज आपल्या आक्रमकतेला मुरड घालून जपून खेळत होता.या दोघांवरच आता सर्व जबाबदारी होती,संयमी म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या राहूल द्रवीडने नुकतेच पंतला आक्रमकतेला संयमाची गरज असते असे सुनावले होते. त्यामुळे तो आज कसा खेळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.त्याने बऱ्यापैकी संयम दाखवत कर्णधार कोहलीला चांगली साथ दिली.

यादरम्यान कोहलीने आपले 28 वे कसोटी अर्धशतक पुर्ण केले,कमालीची चिवट फलंदाजी करत त्याने एक संथ अर्धशतक पूर्ण केले.हळूहळू डाव सावरतोय असे वाटत असतानाच 61 धावांची भागिदारी झालेली असतानाच पंत पुन्हा एकदा निराश करून झेल बाद झाला, त्याने 27 धावा केल्या, त्याला यानसेनने बाद केले.

पाठोपाठ त्यानेच अश्विनलाही बाद करून भारतीय संघाला सहावा धक्का दिला. एका बाजूने एकेक गडी बाद होत असतानाही कर्णधार कोहली मात्र एकांडा शिलेदार होवून लढाई चालूच ठेवत होता. अष्टपैलू म्हणून संघात आलेला शार्दूल ठाकूर आणि बुमराह थोड्या फार अंतराने बाद झाल्यावर भारतीय संघाची अवस्था 8 बाद 210 झाली. एव्हाना कोहली 80 च्या आसपास आला होता, तो खूप निग्रहाने खेळत होता. आज तरी मागील कित्येक सामन्यापासून हुलकावणी देणारे शतक पूर्ण व्हावे हीच सगळ्यांची आस होती, त्याला साथ द्यायला मात्र कोणीही थांबत नव्हते.

निःसंशय यजमाना गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पण भारतीय फलंदाजांनीही आज खूपच निराशाजनक खेळ केला,कदाचित याच निराशेतून कोहलीची अप्रतिम खेळी अखेरीस 79 धावांवर संपुष्टात आली.

रबाडाने एका अप्रतिम चेंडूवर त्याला चकवले आणि चेंडु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला.त्याने 201 चेंडूचा सामना करून या धावा केल्या, ज्यामधे चौकार आणि एक षटकार सामील होता.त्यांनतर एंगीडीने शमीला बाद करून भारतीय डावाचा अंत केला. आपली पन्नासावी कसोटी खेळणाऱ्या रबाडाने आज जबरदस्त गोलंदाजी करत चार गडी बाद केले तर यांसीनने तीन गडी करून त्याला चांगली साथ दिली.

उत्तरार्धात आफ्रिका संघाचीही सुरुवात फारसी चांगली झाली नाही ,कर्णधार डीन एलगरला बुमराहने एका जबरदस्त चेंडूवर चकवुन पुजाराच्या हातून झेलबाद करत यजमानांना मोठा धक्का दिला. त्यानंतरच्या षटकात मार्करम (नाबाद 8) आणि केशव महाराज(नाबाद 8) यांनी अधिक पडझड न होवू देता आजचा खेळ संपला तेंव्हा एक गडी गमावून 17 धावा केल्या आहेत.

भारतीय संघाच्या तुलनेत दुबळा आणि नवखा वाटणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या कसोटीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतरही केलेला प्रतिकार भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे, त्यामुळेच आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेतील पहिला मालिका जिंकण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवायचे असेल तर उद्या आणि पुढिल प्रत्येक दिवशी जोरदार खेळ करावा लागेल, यात काहीही शंका नाही.फलंदाजीतले अपयश आता भरून काढायची जबाबदारी बुमराह आणि कंपनीवर उद्या असेल, आणि त्यात ते यशस्वीच ठरावेत अशी अपेक्षा कोहलीची असणार, बरोबर ना?

संक्षिप्त धावफलक –

  • भारत – सर्व बाद 223, कोहली 79, पुजारा 43, रबाडा 73/ 4 बळी
  • दक्षिण आफ्रिका – 1 बाद सतरा,  एलगर झेल पुजारा गो बुमराह 3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.