Maval News : ‘उठा पांडुरंगा…’ मावळ परिसरात भक्तिमय वातावरणात काकड आरती सोहळा!

एमपीसी न्यूज – ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा l झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा l संत साधुमुनी अवघे झालेती गोळा l सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमळा ll अशा काकड आरतीच्या अभंगातून मावळ तालुक्यातील गावोगावात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. संताची भूमी असलेल्या मावळ तालुक्याचे सांस्कृतिक वैभव या काकड आरतीमधून आजवर टिकून आहे. भल्या पहाटे वडगावसह तालुक्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग व बालचमुसह काकडारतीला हजेरी लावून परंपरा जोपासत आहेत.

मावळ तालुक्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर काकडा आरती सोहळा संपन्न होता असताना, रोज पहाटे पाच वाजता मंगलचरणाने सुरवात करत, भूपाळ्या, भजनमालिका वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी, नाटाचे अभंग व समारोप विनवणीचे अभंग आणि आरती, पसायदानाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होत असते.

काकडा आरती सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रोज साधारण दोनशे भाविकांची उपस्थिती भल्या पहाटे मंदिरात असते. महिला भगिनींची उपस्थिती सुद्धा आरतीचे, निरंजन लावून आणलेले ताट या सोहळ्याची शोभा वाढवतांना दिसत आहे. रोज असणारे पूजेचे मानकरी यांच्यावतीने भाविकांना चहा व नाष्टा याचे आयोजन केले जाते.

संपूर्ण सोहळ्याचे नियोजन, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, ॲड. अशोक ढमाले आदींसह काकडा आरती सोहळ्याचे प्रमुख विणेकरी पंढरीनाथ भिलारे, शंकर म्हाळसकर, बबन भिलारे, विठ्ठल ढोरे,मधुकर पानसरे, शिवाजी शिंदे, देवराम कुडे, संतोष ढोरे, हरियाली पानसरे, महेंद्र ढोरे, रवींद्र तुमकर, राजेंद्र म्हाळसकर व पुजारी मधुकर गुरव हे करत आहेत.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेला काकडा आरती सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त होतो. संपूर्ण मावळ तालुक्यातील गावोगावी भक्तीमय वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती सुरू झाल्याने सगळीकडेच अत्यंत प्रसन्न आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

भल्या पहाटे वडगावसह तालुक्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग व बालचमुसह काकडारतीला हजेरी लावून परंपरा जोपासत आहे. महिला भगिनी आरतीचे ताट घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. रोज सकाळी काकड आरती, अभंग, भूपाळया, आंधळे- पांगूळ, वासुदेव, रूपकाचे अभंग, गौळणी महाआरतीद्वारे पूजा केली जाते व तीर्थप्रसाद दिला जातो.

काकड आरती पुजेचा मान गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळत असतो. ज्या दिवशी पूजेचा मान असतो त्या दिवशी संपूर्ण कुटुंब अबालवृद्धांसह पहाटे मंदिरात येऊन यथासांग पूजा करून मूर्तींना सुंदर हार घालून, प्रांगणात आकर्षक रांगोळी व मंदिरात अतिशय सुंदर सजावट केली जाते. त्यामुळे एकूणच मंदिरात भक्तीमय वातावरण व प्रसन्नता निर्माण होत असते.

‘भल्या पहाटे … उठा जागे व्हारे आता l स्मरण करा पंढरीनाथा l भावे चरणी ठेवा माथा l चुकवी व्यथा जन्माच्या… ‘ अशा प्रकारचे संताचे अभंग आळवून झोपलेल्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न या काकड आरतीच्या माध्यमातून केला जातो आहे.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात अर्थात त्या दिवसापासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री पांडुरंग हे शयन करीत असतात अशी श्रद्धा आहे. म्हणजेच अश्विन शु. पौर्णिमा ते कार्तिक शु. पौर्णिमा या कालावधीत काकडारती उत्सव होत असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.