Ketki Chitale Case : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; देहू संस्थानचा आक्षेप

एमपीसी न्यूज : अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale Case) ही सध्या अटकेत आहे. तिचा अटकपूर्व जामीन देखील रद्द झाला आहे. आता तिच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. संत तुकाराम महाराजांची ‘तुका म्हणे’ ही स्वाक्षरी असल्याने पोस्टमध्ये तिचा वापर केल्याने केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी देहू संस्थानने केली आहे. 

अभिनेत्री केतकी चितळे हिला काल 14 मे रोजी अटक झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिला ठाणे पोलिसांनी अटक केली. आता तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र देहू संस्थानने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिले आहे.

Pimpri News : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तिने तुका म्हणे शब्द वापरुन वादग्रस्त लिखाण पोस्ट केले. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहेत. जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप नितीन मोरे म्हणाले, की ”तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा आहे. चुकीच्या पद्धतीने तिचा वापर करू नका. संत, राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत जर कोणी चुकीचे वक्तव्य, लेखन केले तर सरकारने कोणीतरी एफआयआर देण्याची वाट पाहू नये, तात्काळ कारवाई करावी. कोणत्याही संतांच्या, महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य, लेखन करणे चुकीचे असल्याचेही अध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य व्यक्ती भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. केतकी चितळे (Ketki Chitale Case) यांनी केलेली पोस्ट मुळची भाजप प्रवक्ते अधिवक्ता विनायक आंबेकर यांची आहे. या प्रकरणी आता वातावरण तापले असून, कळवा ठाणे नंतर इतर ठिकाणीही अनेक गुन्हे दाखल होत आहेत. सध्या या प्रकरणात शरद पवार यांनी आपले मत प्रकट केलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.