Bhosari News : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि गर्भपात

एमपीसी न्यूज – इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर आरोपी तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून एक ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला.

उमेश गजानन सोनवणे (वय 21, रा. अंमळनेर, जि. धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. 7) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी आणि आरोपी उमेश यांची मागील दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर उमेशने मुलीसोबत मैत्री केली. उमेशने अल्पवयीन मुलीला फूस लावल्याने ती अनेक वेळा त्याच्याकडे अंमळनेर येथे गेली होती. 27 जुलै रोजी पिडीत मुलगी घरातून निघून जाऊन आरोपीकडे अंमळनेर येथे गेली. तिथे तिने विषारी औषधाच्या गोळ्या खाल्ल्या आणि तिला तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला  पुण्यातील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पीडित मुलीने तिच्या बाबतीत घडलेली हकीकत सांगितली. त्यामध्ये ती दोन महिन्यांपूर्वी गरोदर असल्याचे तिला समजले होते. त्यानंतर उमेशने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.