Chinchwad News : जसे कर्म, तसे भाग्य – ज्योती वाडेकर

एमपीसी न्यूज – “माणसाचे जसे कर्म, तसे भाग्य त्याच्या वाट्याला येते, असे मत  ब्रह्मकुमारी ज्योती वाडेकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटना, चिंचवड शाखा आयोजित सभासदांच्या वाढदिवसाच्या मासिक सत्कारानिमित्त विरंगुळा केंद्र येथे प्रवचनपुष्प सादर करताना ज्योती वाडेकर बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटना, चिंचवड शाखाध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, सुहास संगम, प्रकाश चव्हाण, अनुराधा रूकडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामुदायिक राष्ट्रगीताने आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “समस्या, अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी आणि विधायक उपक्रमांसाठी संघटना अत्यावश्यक असते!” असे मत व्यक्त केले. चंद्रकांत कोष्टी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने प्रातिनिधिक मनोगतांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

ज्योती वाडेकर पुढे म्हणाल्या की, “शारीरिक, आर्थिक स्वातंत्र्याइतकेच भावनिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही वैचारिक कार्याचा प्रारंभ करताना आधी मनाला शांत करा; कारण मानवी मन हे एखाद्या अवखळ बालकासारखे चंचल असते. शरीराला एखाद्या वस्तूप्रमाणेच आपण ते माझे आहे, असे समजतो.

वास्तविक शरीरात आत्मा अस्तित्वात असेपर्यंत शरीर चैतन्यशील असते. चैतन्यरूपी ऊर्जा कधीही नष्ट होत नाही; तर ती फक्त कालांतराने एका शरीरातून नूतन शरीरात स्थलांतरित होते. शरीर धारण करणाऱ्या माणसाने केलेल्या सत्कृत्यांची अन् दुष्कृत्यांची जबाबदारी सर्वस्वी त्याचीच असते. त्यामुळे सुख, दु:ख, भोग, पीडा यासाठी दुसऱ्याला दोष देऊ नका. अपेक्षारहित कर्म करून दुसऱ्याला सन्मान, आनंद दिल्याने विलक्षण समाधानाची अनुभूती येईल.

मनातील विचारांनी आपल्या कर्माची सुरुवात होते. त्यामुळे स्वच्छ, निरिच्छ मनाने कर्म करीत राहिल्यास तसेच भाग्य तुमच्या वाट्याला येईल!” सामुदायिक ध्यानधारणेच्या प्रात्यक्षिकाने ज्योती वाडेकर यांनी आपल्या प्रवचनाचा समारोप केला. गंगाधर जोशी, श्रीकांत पानसे, मोरेश्वर देशपांडे, राजेंद्र भागवत, जयश्री गोवंडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नामदेव तारू यांनी सूत्रसंचालन केले. दीपक रांगणेकर यांनी आभार मानले. सामुदायिक ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.