Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद शाळेत महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन रविवारी (दि. 1 मे) जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असा जयघोष केला. यानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून झाली.यावेळी पर्यवेक्षिका रेणू शर्मा, प्राथमिक विभाग प्रमुख धनश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सरोदे तेजस्विनी इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य सार्थक झाल्यासारखे आहे. प्रत्येकाला गर्व असावा असा आपला हा महाराष्ट्र!

छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,अनेक संत यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत असे वक्तव्य करून, महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून शालेय शिक्षिका  जयश्री गायकवाड यांनी दिली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख  पर्यवेक्षिका  रेणू शर्मा यांनी केले.सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा  रजनीगंधा खांडगे आदींनी ‘महाराष्ट्र दिनाच्या’ व ‘कामगार दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या .

आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत,प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.