Manobodh by Priya Shende Part 34 : उपेक्षा कदा रामरूपी असेना

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 34 (Manobodh by Priya Shende Part 34)

उपेक्षा कदा रामरूपी असेना

जीवा मानवा निश्चयो तो वसेना

शिरी भार वाहेन बोले पुराणी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

ह्या श्लोकात पुन्हा एकदा समर्थक सांगत आहेत की “उपेक्षा कदा रामरूपी असेना” भगवंताकडे आपल्या भक्तांसाठी उपेक्षा, अवहेलना नाहीच मुळी. जो कोणी त्यांची अनन्यभावाने भक्ती करेल, त्याच्या सोबत भगवंत असतोच असतो. मग तो भक्त राजा असू दे की, अगदी सामान्य माणूस असू दे, ह्याची कृपा दृष्टी सर्वांवर असतेच, फक्त माणसाची श्रद्धा अढळ हवी.

त्या भगवंताने जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट आले तेव्हा तेव्हा त्या संकटा मधून भक्तांना सोडवले. परित्राणाय साधुनां… हे त्याचं ब्रीदवाक्यच आहे.

वराह अवतार घ्या, राम अवतार घ्या, श्री कृष्ण अवतार घ्या, नृसिंह अवतार घ्या, सगळ्या अवतारात भगवंताने त्याच्या लीला दाखवून सगळ्यांना संकटमुक्त केलंय. वराह अवतारात पृथ्वीचा भार आपल्या सूळांवर घेतला. रामावतारात रावणासारख्या महापराक्रमी दुष्टाचा वध केला. कित्येकांचा उद्धार केला. कृष्ण अवतारात अनेक राक्षसांचा संहार केला आहे.

Ashadhi Wari 2022 : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय; आषाढीवारी आधीच मंदिरात करणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

द्रौपदीच्या वस्त्रहरणात मोठे दिग्गज पांडव, भीष्म, गुरु द्रोणाचार्य त्या सभेत असताना, द्रौपदीची लाज राखली ती, भगवान श्रीकृष्णाने. नृसिंह अवतारात भगवान साक्षात खांबातून प्रकट झाले भक्त प्रल्हादासाठी. तर जिथे-जिथे भक्ताची आर्त हाक येते, तिथे तिथे भगवान त्यांना कोणत्याही रूपात जाऊन मदत करतात. म्हणून समर्थ म्हणताहेत की, “शिरी भार वाहेन बोले पुराणी”.

भगवान त्याच्या ब्रीदवाक्यला जागतो. त्याचे कर्तव्य चोख बजावतो. पण माणसाचं काय हो? समर्थ म्हणताहेत की, “जीवा मानवा निश्चयो तो वसेना”

Todays Horoscope 13 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

भगवंत आपली कामगिरी चोख पार पाडतात, पण आपण माणसं काय करतोय? आपली निस्वार्थ भक्ती आहे का? आपली श्रद्धा अढळ आहे का? आपण तर संसारात असं गढून गेलोय की, संसारताप वाहता वाहता दुःखी झालोय की, देवाची भक्ती करणं राहूनच जातं (Manobodh by Priya Shende Part 33). संकट आलं संसारात की, भगवंताची आठवण येते आणि माझं हे संकट सोडवू म्हणून, तेव्हा फुल, नारळ प्रसाद माणूस देवाला वाहतो आणि तेव्हा रडून त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी धडपड करायची, अशाने देव कसा प्रसन्न होईल हो?

आपला निश्चयच होत नाही. निर्धार होत नाही. आपण संसारामध्येच गुरफटून जातो. त्याची भक्ती करायला वेळच उरत नाही. जेव्हा जेव्हा आपण भक्ती करतो ते, स्वार्थासाठी करतो, काहीतरी त्याच्याकडे मागण्यासाठी करतो. ही वरवरची भक्ती आहे. त्यात कुठेही श्रद्धा नाही, भक्ती नाही, केवळ उपचार, व्यवहार आणि दिखावा असतो. उगीच हात जोडले म्हणून तो नमस्कार होत नाही. म्हणूनच देवाची भक्ती ही निश्चयपूर्वक करावी. सश्रद्ध होऊन करावी. त्यात जरापण मनाची द्विधा अवस्था नको.

अनन्यभावाने केलेल्या भक्तीला परमेश्वर कधी उपेक्षित ठेवत नाही. तो सतत भक्तांच्या सोबतच असतो, “नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.