Pune News: किस्स्यांमधून उलगडले भावे आणि पाटील यांच्या व्यक्तीमत्वाचे अंतरंग; खासदार शरद पवार यांनी दिला मैत्रीच्या आठवणींना उजाळा

एमपीसी न्यूज : एस.पी. कॉलेजमध्ये एका कथ्थक नृत्यांगनेकडून ‘हे नृत्य करायलाही अक्कल लागते’, अशा जिव्हारी लागणा-या वाक्याची खूणगाठ बांधून थेट रोहिणी भाटे यांच्या नृत्य शाळेत कथ्थकचे धडे गिरवणारा माझा मित्र श्रीनिवास, तर थेट सिक्कीमच्या राज्यपाल पदापर्यंत मजल मारलेला माझा मित्र श्रीनिवास याच्या माझ्यावर असलेल्या प्रेमात मला यत्किंचीतही फरक आढळून येत नाही. मधुकर भावेंनी देखील आचार्य अत्रेंवर नितांत श्रद्धा ठेवून पत्रकारिता क्षेत्रात एक शिखर गाठले. आज सत्कार करण्यात आलेल्या या दोन्ही सत्कारार्थींनी त्यांच्या श्रद्धा स्थानावर आणि मैत्रीवर जी अढळ निष्ठा दाखवली, त्यामुळे ते या उंचीपर्यंत येऊ शकले. अशा विविध किस्स्यांमधून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांच्या व्यक्तीमत्वांचे अंतरंग उलगडले. 

 निमित्त होते ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आज बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रमुख पाहुणे डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचेकुलपती डॉ.पी.डी.पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझे आणि श्रीनिवास पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयात झाले. श्रीनिवास पाटील हे एस.पी. कॉलेजला तर मी बीएमसीसी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. आमचे महाविद्यालय हे वाणिज्य शाखेचे असल्याने तिथे शिक्षण घेणा-या मुलींची संख्या तुलनेने कमी होती, त्यामुळे आमच्या वरचेवर एस.पी. कॉलेजमध्ये चकरा व्हायच्या. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो असल्याने बीएमसीसी पेक्षा एस.पी. कॉलेजमध्ये अधिक मोकळेपणाने वावरत असू. इथून जी आमची दोस्ती जमली ती आजवर कायम आहे. राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुरूवातीच्या काळात सभांची भित्तीपत्रके चिकटवण्याचे काम आम्ही दोघांनी सोबत केले आहे. श्रीनिवास पाटील त्या भित्तीपत्रकांना खळ लावून द्यायचे आणि मी सायकलवर उभे राहून ते भिंतीवर लावायचो, असा आमचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. मधुकर भावे हे  प्र.के. अत्रेंच्या ‘मराठा’मध्ये नोकरी करीत होते. रोखठोक आणि सडेतोड लिहिण्याचा गुण त्यांनी अत्रेंकडूनच घेतला. आमची देखील राजकीय भूमिका कुठे चुकत असेल, तर त्याबाबतही लिहितांना त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. आम्ही गरिबीतून आणि हाल अपेष्टातून पुढे आलो. पण आम्हाला हात दिलेल्यांशी कृतज्ञ आणि विचारांशी बांधिलकी ठेवली, त्यामुळे प्रगती करीत राहिलो.

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र घडवतांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण शरद पवारांनी दिली. श्रीनिवास पाटील एस.पी. कॉलेजमध्ये आणि पवार बीएसीसी मध्ये शिकत असतांना मी आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. शरद पवार यांच्या सांगण्यावरून नोकरी सोडून मी राजकारणात प्रेवश केला. प्रारंभी काही अडचणी आल्या, पण पवारांनीच राजकीय बस्तान बसवून दिले. त्यांच्यासोबत कायम राहू शकलो नाही, याची मनात खंत आहे. त्यांच्याही मनात कदाचित ही खंत असेल, असे वाटते. आजआम्ही दोघेही वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही आमची मैत्री कायम आहे.

यावेळी श्रीनिवास पाटील, मधुकर भावे आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी केले. सूत्रसंचालन अध्यक्ष उद्धव कानडे यांनी केले, तर उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.