IPL2022 News :मुंबई संघाने गुजरातवर 5 धावांनी मिळवला रोमहर्षक विजय.

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) टाटा आयपीएल मधल्या कालच्या नंबर 1 आणि नंबर लास्टच्या दोन संघात झालेल्या सामन्यात या स्पर्धेत सुरुवातीपासूनच जोरदार कामगीरी करणाऱ्या गुजरात टायटन या मजबूत संघाला फक्त 5 धावांची मात देत मुंबई इंडियन्सने एक रोमहर्षक विजय मिळवला.

आज गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम मुंबई संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले,मात्र रोहीत शर्मा आणि ईशान किशनने पहिल्या गड्यासाठी चांगली भागीदारी करून मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली,ही जोडी आज एकदम भन्नाट  फॉर्म मध्ये वाटत होती, खास करुन रोहीत ,बऱ्याच दिवसांनी रोहीत भरात आला होता.

त्याचे फटके, त्यातली सहजता आज एक मोठी आणि देखणी खेळी बघायला मिळणार असे वाटत असतानाच त्याला रशीद खानला रिव्हर्स स्वीप मारण्याची खुमखुमी आली आणि एक चांगली खेळी फुलण्याआधीच मावळली, खरेतर पंचांनी हे अपील फेटाळून लावले होते, मात्र डीआरएस मध्ये रोहीत पायचीत असल्याचे स्पष्ट झाले आणि रोहीतचा निराश चेहरा खूप काही सांगून गेला,रोहीतने 28 चेंडूत 5 चौकार  आणि दोन षटकार मारत 43धावा केल्या, त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने सुरुवात चांगली केली खरी,मात्र तो फक्त 13 धावा काढून सांगवानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

पाठोपाठ ईशान किशन पण चांगले खेळत असताना आपला संयम हरवून बसला,आणि अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर 45 धावा काढून बाद झाला,आणि मुंबई इंडियन्सची गाडी पुन्हा एकदा रुळावरुन घसरली,त्यातच पोलार्डचा धावांसाठीचा संघर्ष आजही संपला नाही आणि 14 चेंडूत फक्त 4 धावा  काढून रशीद खानच्या फिरकीवर अक्षरशः ताथाथैय्या करुन त्रिफळाचित झाला,आणि मुंबई संघ आजही पहिले पाढे 55 करणार असे वाटत असताना टीम डेविडने जबरदस्त फलंदाजी करत मुंबई संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली त्याला तिलक वर्मानेही बऱ्यापैकी साथ दिली ज्यामुळे मुंबई इंडियन्सने आपल्या 20 षटकात 6 गडी गमावून 177 धावा केल्या,टीम डेविड 21 चेंडूत 4 षटकारासह 44 धावा करुन नाबाद राहिला.गुजरातसाठी रशिद खानने सर्वाधिक दोन गडी बाद केले.

गुजरात संघाची मजबूत फलंदाजी आणि आत्मविश्वास बघता 120 चेंडूत 178 धावा हे लक्ष्य फारसे कठीण वाटत नव्हते,त्यातच शुभमन गील आणि वृद्धीमान साहाने जबरदस्त सुरुवात करुन देत मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढायला सुरुवात केली.फक्त 73 चेंडूत 106 धावांची शतकी सलामी देत या जोडीने केलेली सुरुवात रोहीतचे टेन्शन वाढवत होती,दरम्यान या दोघांनीही आपापले अर्धशतक पूर्ण केले होते,मात्र मुर्गन अश्विनने आधी शुभमन गीलला तर पाठोपाठ साहालाही बाद करुन ही जोडी फोडली आणि रोहीतला मोठा दिलासा दिला.

गीलने 52 तर साहाने 55 धावा केल्या, यानंतरही गुजरात संघाची मजबूत फलंदाजी बाकी असल्याने विजय त्यांचाच होईल असे वाटत असतानाच क्रिकेटची अनिश्चितता पुन्हा एकदा सर्वाना अनुभवता आली,नवोदित साई सुदर्शन  आज फारसे योगदान न देता बाद झाला आणि सामना रंगतदार होईल अशी शक्यता निर्माण झाली.

मात्र तरीही हार्दिक पंड्या आणि डेविड मिलर मैदानावर होते आणि जास्तीत जास्त विजयाची शक्यता गुजरातच्या विजयाचीच वाटत होती ,षटकामागे 10 धावांची सरासरी विजयासाठी  हवी असल्याने गुजरात सहज जिंकेल असे वाटतही होते, मात्र नेमके याचवेळी हार्दिक पंड्या 24 धावा करून धावबाद झाला,आणि पाठोपाठ खतरनाक तेवतीयाही धावबाद झाला आणि सामना एकदम रोमांचक स्थितीत आला,अखेरच्या दोन षटकात 20 धावा हव्या असताना बुमराहच्या 19 व्या षटकात 11 धावा निघाल्या आणि शेवटच्या सहा चेंडूत 8 धावा हव्या होत्या,आणि त्या रोखण्यासाठी सज्ज होता, डॅनिअल सॅम्स,त्याच्या समोर होता मिलर, जो या फॉरमॅट मधला अतिशय खतरनाक खेळाडू मानला जातो,मात्र या कठीण परिस्थितीतही सॅम्सने अतिशय सुंदर आणि भेदक गोलंदाजी करत गुजरात संघाला विजयापासून रोखून संघासाठी लाख मोलाची कामगिरी करत संघाला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

मिलर सारखा खतरनाक खेळाडुही या 8 धावा काढण्यात अपयशी ठरला,आणि गुजरात संघ फक्त  5 धावांनी पराभूत झाला.अर्थात अजूनही गुजरात संघ प्रथम क्रमांकावर तर मुंबई संघ अखेरच्या क्रमांकावरच आहेत.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स
6 बाद 176
रोहित,43,किशन 45,वर्मा 21,डेविड नाबाद 22
खान 24/1,फर्ग्युसन 44/1,संगवान 23/1
विजयी विरुद्ध
5 बाद 175
साहा 55,गील 52,पंड्या 24,मिलर नाबाद 19
एम अश्विन 29/1,पोलार्ड 13/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.