Pimpri News : राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

प्रश्नमंजुषा, गीत, व्हिडीओ मेकिंग, भित्तीचित्र आणि घोषवाक्य या पाच गटात होतेय स्पर्धा

एमपीसी न्यूज – ‘लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्व’ या विषयावर आधारित तयार केलेल्या संकल्पना आणि विचारांना प्रोत्साहित करणे, जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन लोकसहभागातून लोकशाही व्यवस्था मजबूत करणे या उद्देशाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रश्नमंजुषा, गीत, व्हिडीओ मेकिंग, भित्तीचित्र आणि घोषवाक्य अशा पाच प्रकारत ही स्पर्धा होत असून सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत.

‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेद्वारे सृजनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक मतातील सामर्थ्याचा पुनरुच्चार करावयाचा आहे. या स्पर्धेतून जनतेच्या गुणांना आणि सर्जनशीलतेला आवाहन करतानाच त्यांच्या सक्रीय सहभागातून लोकशाहीला बळकटी दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन भारत निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले असून या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत.

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धांचे वर्गीकरण करण्यात आले असून त्याची विभागणी संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी अशा तीन श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीमध्ये विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके असतील. संस्थांच्या श्रेणीत 4, तर व्यावसायिक आणि हौशी स्पर्धकांच्या श्रेणीत 3 स्पर्धकांना विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात येणार आहे.

सर्व प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत असून प्रवेशिका [email protected] यावर पाठवण्यात याव्यात. राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत घेतल्या जाणा-या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यासाठी https://ecisveep.nic.in/contest/ हे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे, असे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

विविध संस्था, संघटना, महिला बचत गट, महाविद्यालये, खासगी दवाखाने, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक आस्थापना, हॉकर्स, मिळकतधारक, सर्व खासगी आस्थापनांनासह नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.