Nigdi : सासरच्या त्रासाला कंटाळून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न!; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे दोनच्या सुमारास निगडी येथे घडली.

सासरे विनोद निकाळजे, सासू कांचन निकाळजे, पत्नी हर्षाली गोरे, पत्नीचा मामा नितीन केदारी, पत्नीच्या मामाची आई (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय पतीची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादीला त्यांची पत्नी आणि सासरचे लोक वारंवार किरकोळ कारणांवरून त्रास देत होते. त्यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होती. या भांडणाला कंटाळून रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पतीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविला आहे. पतीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ‘सततच्या भांडणाला कंटाळून हे पाऊल उचलले असून आरोपींनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.