Pimpri News: महापालिका 179 कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांसाठी देखरेख यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र, 200 कोटी खर्चाच्या या कामासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत केवळ दोनच ठेकेदारांनी सहभाग घेतला असतानाही लघुत्तम दर सादर केलेल्या एका ठेकेदाराला काम देण्यात येणार आहे. या कामासाठी 178 कोटी 48 लाख रुपये खर्च होणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला  स्थायी समितीने मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांच्या आसपास आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारतीही शहरात आता उभ्या राहत आहेत. सार्वजनिक सुरक्षितता तसेच एखादा गंभीर गुन्हा घडल्यास आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मोठा उपयोग होतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे अनेक मोठ मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीसह महापालिका शाळा, अग्निशमन केंद्र या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

महापालिका सभेने सीसीटीव्ही देखरेख प्रकल्पाकरिता सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात 200 कोटींची अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर केली आहे. स्थायी समिती सभेनेही 26 फेब्रुवारी 2021 रोजी विविध कामे करण्यास मान्यता दिली आहे.  सीसीटीव्ही सर्व्हेलन्स कामासाठी पोलीस दल, नागरिक आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांतून मागणी होत होती. ही मागणी विचारात घेऊन सीसीटीव्ही कामासाठी 200 कोटी तरतूद लागत असल्याने या ठरावातील इतर कामे वगळून फक्त सीसीटीव्ही यंत्रणेचे काम संपूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार, महापालिकेच्या विद्युत विभाग – दूरसंचार विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

सीसीटीव्ही देखरेख प्रकल्प उभारण्याकरिता 178  कोटी 57 लाख 12 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी मॅट्रिक्स सिक्युरिटी अॅण्ड सहेलन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी निविदा दरापेक्षा 0.5  टक्के कमी म्हणजेच 178 कोटी 48 लाख 19 हजार रुपये दर सादर केला. त्यांचा दर लघुत्तम असल्याने निविदा स्वीकारण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 21 जानेवारी 2022 रोजी मान्यता दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.