Pimpri news: शहरात सर्वत्र खोदाई; नागरिकांना होतोय त्रास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र खोदाई केली जात आहे. शहराच्या विविध भागातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खोदले आहेत. कामे अत्यंत संथ गतीने केली जात आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खोदलेले रस्ते बुजविले जात नाहीत. तर, काही ठिकाणी अर्धवटच बुजविले जातात.  परिणामी, वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना,  स्मार्ट सिटीचे केबल, एमएसबीईचे केबल, ड्रेनेजच्या कामासाठी देखील रस्त्यांची खोदाई केली आहे. पिंगळेगुरव, पिंगळेसौदागर परिसरात स्मार्ट सिटीच्या एबीडी अंतर्गत कामे, पाण्याची पाईपलाईन, सिमेंट काँक्रीटीकरणासाठी रस्ते खोदले जात आहेत. चिंचवडगाव, प्रेमलोक पार्क, बीजलीनगर, पिंपळेसौदागर, गुरव, सांगवी, रहाटनी, वाकड, चिंचवड, थेरगाव, डांगे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. काम अतिशय कासवगतीने केले जाते. काही ठिकाणी चार महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवले आहेत.

नागरिकांना जाता-येता मोठा त्रास सहन करावा लागतो. धोकादायकरित्या रस्ता पार करावा लागत आहे. वयोवृद्ध, लहान मुलांना जाता येत नाही. खेळताना खड्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहने आपल्या घरापर्यंत नेता येत नाहीत. नागरिकांना पंधरा पंधरा दिवस वाहने घरापासून लांब रस्त्यावर पार्क करावी लागत आहेत. वाहने चोरीला जाण्याच्या घटना देखील घडत आहेत. सातत्याने केलेल्या खोदाईमुळे पाईपलाईन फुटण्याच्या घटना वाढल्या आहेत.  लिकेज होते.  त्यामुळे पाणी देखील वाया जाते.

सांगवीतील मानसी जोशी म्हणाल्या, नवी सांगवीतील कृष्णा चौकातून काटे चौकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील विद्यानगर लेन एकमध्ये तीन पाईप टाकण्यासाठी रस्ता अनेक दिवसांपासून खोदला होता. ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने बुजविले आहे. तेथून जाताना दुचाकी अडकत आहेत. आतापर्यंत अनेकजण रस्त्यावरून घसरून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यामुळे पूर्ण गल्ली खराब झाली आहे.  रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदाईमुळे कृष्णा, साई, पिंपळेगुरव चौकात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. वीजपुरवठा देखील वारंवार खंडित होतो. कोरोना काळात खासदार, आमदार, नगरसेवक कोणीही फिरकले नाही. केवळ पालिकेचे लोक दोनवेळा सर्व्हेसाठी येवून गेले.

चिंचवड प्रेमलोक पार्क येथील संदीप शिंदे म्हणाले, गेल्या अनेक महिन्यापासून प्रेमलोक पार्क ते बिजलीनगरला जोडणारा रस्ता उखडलेल्या अवस्थेत आहेत. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पाण्याचे पाईप टाकून काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही रस्त्यावर खडी टाकून ठेवली आहे. काम अर्थवट ठेवले आहे. रस्त्यांची एक मार्गिका रहदारीसाठी मोकळी आहे.

या रस्त्यावरून कंपन्यांना माल पुरवठा करणा-या अवजड वाहनांची ये-जा असते. बिजलीनगर रस्त्याने ही वाहने जातात. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होते. वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. पादचारी नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. रस्त्याच्या दुरुस्तीकरीता वारंवार पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार केली. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. स्थानिक नगरसेवक याबाबत उदासीन आहे. रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे. अन्यथा पालिकेच्या अभियंत्यांना घेराव घातला जाईल. त्यांच्या कार्यालयाला टाळे लावून निषेध केला जाईल असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

ययाबाबत बोलताना पालिकेचे उपअभियंता, प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन आणि पावसाळ्यामुळे कामे सुरू करण्यास विलंब झाला.  त्यामुळे मे पर्यंत होणारी कामे पूर्ण झाले नाहीत. ही कामे आता सुरू केली आहेत. कोरोनासाथीमुळे सुरक्षित अंतर बाळगून कामे करावी लागत आहेत. गरजूंना काम मिळत आहे. पावसाळ्यापूर्वीची ही कामे होती. लॉकडाऊन, कुशल कामगारांची कमतरता यामुळे कामे पुढे ढकलली आहेत. लांबलेल्या पावसामुळे नागरिकांची थोडी अडचण होत आहे. शाळा सुरू नाहीत, जेष्ठ नागरीक जास्त बाहेर पडत नाहीत. वाहतूक देखील कमी आहे. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.