Pimpri News: सरकारने सर्व कामे ठप्प करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मार्ग काढावा – संभाजीराजे

एमपीसी न्यूज – एसटी कर्मचा-यांच्या फार नाजूक विषय आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की बाकीचे कामे राहली तरी चालतील. पण, बिचारे एसटीचे कामगार आहेत. त्यांच्याबाबत काय तो निर्णय घ्यावा. बाकीची सगळी कामे बंद करावी आणि ताबडतोब बैठक लावावी. काय तो मार्ग काढावा आणि एसटी कामगाराला दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्यशासनामध्ये करण्यात यावं अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. विलिनीकरणाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. मात्र तरी आंदोलनकर्ते कर्मचारी संपावर ठाम आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं आहे, मात्र तरीही एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत.

याबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले, ”एसटी कर्मचा-यांना काय देऊ शकता. यावर सरकारने चर्चा करावी. ताबडतोब शिष्टमंडळाला बोलवून घ्यावे. त्यांच्यासोबत चर्चा करावी. किती दिवस ते आझाम मैदानावर बसणार आहेत. एसटी बंद असल्याने सामान्य माणसालाही अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज सगळ्या एसटी बंद आहेत. सामान्य माणसाला त्रास होत असल्याने एसटी कामगारालाही आनंद होत नाही. त्यामुळे सरकारने बाकीची सगळी कामे बंद करावीत आणि ताबडतोब बैठक लावावी. काय तो मार्ग काढा आणि एसटी कामगाराला दिलासा द्यावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.