PCMC News : महापालिका रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती द्या; ‘सीएम’ला पाठविले पत्र

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्याच्या औषध उपचाराच्या दरामध्ये 200 ते 300 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी नागरी समस्या निवारण समितीचे निमंत्रक मारुती भापकर यांनी राज्य शासनाकडे केली. या निर्णयाविरोधात गुरुवारी (दि.28) विविध सामाजिक संघटना आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, कोविड महामारी, लॉकडाऊन, प्रचंड महागाई, बेरोजगारी यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त असताना प्रशासक राजेश पाटील यांचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांचे कंबरड मोडणार आहे. या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य झोपडपट्टीवाशिय व व कामगार उपचार घेत असतात. त्यामुळे प्रशासक राजेश पाटील यांच्या या मनमानी हुकूमशाही अन्यायकारक निर्णयाला आपण स्थगिती द्यावी.

 

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे शालेय साहित्य वाटपाच्या टक्केवारीच्या घाणेरड्या राजकारणामुळे विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप वेळेत होऊ शकले नाही. याला सर्वस्वी प्रशासक राजेश पाटील हेच जबाबदार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य वाटप तातडीने करण्याचे आदेश आपण निर्गमित करावे. या दोन्ही महत्त्वाच्या मागण्याबाबत आम्ही सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवार (दि.28) रोजी महापालिकेच्या मुख्यालयासमोर जनआंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.