Talegaon News : संत साहित्यात सकारात्मकतेचा स्त्रोत – प्रा. मिलिंद जोशी

एमपीसी न्यूज – संत साहित्यात सकारात्मकतेचा स्त्रोत ओतप्रोत भरलेला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

तळेगाव स्टेशन येथे श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘प्रश्न आजचे… उत्तर संतसाहित्याचे’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. नगरसेवक गणेश काकडे अध्यक्षस्थानी होते. तसेच पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला मुख्य समन्वयक राजेंद्र घावटे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव उपस्थित होते.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, “संत साहित्य हा केवळ ज्येष्ठ व्यक्तींसाठी वृद्धापकाळात वाचण्याचा, ऐकण्याचा विषय आहे, असा मोठा गैरसमज समाजात आहे. वास्तविक भक्ती, हास्य, करुण, वीररस यांचा परिपोष करणारे संत साहित्य हे तारुण्यातच वाचायला हवे. कारण त्यासाठी उत्तम अभिरुचीची गरज आहे. अध्यात्म, परमार्थ, निवृत्ती या पलीकडे आजच्या जीवनात माणसाला जे प्रश्न भेडसावतात, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे संतसाहित्यात आहेत. आज अनारोग्याचा गंभीर प्रश्न समाजापुढे उभा आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ रामदासस्वामींनी गावोगावच्या तरुणाईला बलसंवर्धनासाठी प्रवृत्त केले होते, हे जाणून घेतले पाहिजे.

ब्राह्ममुहूर्तावर उठणे, योग अन् प्राणायाम करणे, भरपेट न्याहारी, दुपारी मध्यम जेवण आणि रात्री मिताहार घेणे, या गोष्टी संतांनी सांगितल्या आहेत. शरीर इंद्रियांचे नियमन हवे, आहारविहार सात्त्विक असावा, जीवनात विवेक अन् वैराग्य यांचा समन्वय हवा, असे संतसाहित्यात नमूद केले आहे. माणसाला उदरनिर्वाहासाठी, व्यावसायिक कारणांसाठी समाजात मिसळावे लागते; परंतु मानवी जीवनात लोकांताइतकाच एकांतही महत्त्वाचा आहे. एकांतामुळे माणूस आपला आतला आवाज ऐकू शकतो, असे संत म्हणतात.

आज समाज वैफल्यग्रस्त, मूल्यविवेकहीन आणि नैराश्याकडे झुकलेला आहे. परंतु संतसाहित्यात या सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असून त्यावर सकारात्मक उपायदेखील सांगितले आहेत. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांमध्ये बालवयापासून संतसाहित्याची गोडी निर्माण केली पाहिजे. आज शिक्षणामध्ये सॉफ्टस्किल्सला खूप महत्त्व दिले जाते; पण संतसाहित्यात सदाचाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. या सृष्टीची निर्मिती कशी झाली, या प्रश्नापासून मानवी जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण संतसाहित्यात आढळून येते, असेही ते म्हणाले.

तंत्रज्ञान अन् तत्त्वज्ञान यांच्या समन्वयातून वैश्विक पसायदान मागणारे संतसाहित्य हे मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असल्यासागे सांगत ज्ञानेश्वरमाउली, तुकोबा, रामदास, एकनाथ, योगी अरविंद, विवेकानंद, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, अनिल अवचट असे विविध संदर्भ उद्धृत करून आपल्या अतिशय ओघवत्या वक्तृत्वशैलीने प्रा. मिलिंद जोशी यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.

राजेंद्र घावटे यांनी आपल्या मनोगतातून, “सांस्कृतिक अभिसरणासाठी अतिशय सक्षम अशी पिढी गणेश व्याख्यानमालेच्या माध्यमातून घडत आहे, असे गौरवोद्गार काढले. गणेश काकडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, ‘तळेगाव शहराला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा आहे, असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी सुमारे बारा वर्षांपासून मावळ परिसरातील आदिवासी आणि समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणाऱ्या सामाजिक सहयोग उपक्रम संस्था (कॅप) या प्रामुख्याने ज्येष्ठांनी चालविलेल्या सेवाभावी संस्थेला श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत सन्मान स्वीकारला.

कार्यक्रमाच्या संयोजनात मयूर राजगुरव, उमाकांत महाजन, संदीप भालके, सदानंद धोत्रे, अश्विनी शेलार यांनी परिश्रम घेतले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप राजगुरव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.