Pune News : राष्ट्रपती कोविंद यांचे अत्याधुनिक SU-30 MKI विमानाच्या सिम्युलेटर मधून ‘उड्डाण’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पुणे हवाई तळाला भेट

एमपीसी न्यूज – भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी आज (मंगळवार, दि.07) भारतीय हवाई दलाच्या पुणे हवाई तळाला भेट दिली. यावेळी हवाई दलाच्या जवानांनी हवेत विविध कसरती करून दाखविल्या तसेच, राष्ट्रपती कोविंद यांनी अत्याधुनिक SU-30 MKI विमानाच्या सिम्युलेटरमधून ‘उड्डाण’ केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हवाई तळावर आगमन झाल्यानंतर दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडचे हवाई दल अधिकारी कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विक्रम सिंग आणि दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडच्या ‘हवाई दल पत्नी कल्याण संघटना’ याच्या अध्यक्ष डॉ. आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रपतींना यावेळी संचलनाची पाहणी केली, संचलनामध्ये एसयू-30 एमकेआय विमान आणि ‘मेड इन इंडिया’ आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होता. राष्ट्रपतींनी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या चित्तथरारक हवाई कसरती यांचा अनुभव घेतला. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी जॅग्वार विमानाच्या मदतीने ‘भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे’ दर्शविणारा ’75’ हा आकडा पुण्याच्या आकाशात साकारत उपस्थितांची मने जिंकली.

राष्ट्रपती कोविंद यांनी अत्याधुनिक SU-30 MKI विमानाच्या सिम्युलेटर मधून ‘उड्डाण’ केले. लढाऊ विमानांच्या असामान्य क्षमतेचे त्यांना दर्शन करून देण्यात आले. हवाई तळावरून प्रस्थान करण्यापूर्वी, त्यांनी पुण्यातील हवाई दल तळाचा आढावा घेतला आणि हवाई कसरतींमध्ये सहभागी झालेल्या विमान दलातील सदस्य आणि जवानांशी संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.