Pune Crime News : अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी बजावली नोटीस

एमपीसी न्यूज – अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात पत्नीचा छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आता जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याबाबत अनिकेत विश्वासराव यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29) यांनी तक्रार दिल्यानंतर अनिकेतसह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत हा मराठी नाटक आणि सिनेमा जगतातील प्रसिद्ध अभिनेता आहे, तर त्याची पत्नी स्नेहा हीदेखील अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पत्नीचे नाव आपल्यापेक्षा मोठे होईल या भीतीने तिला वारंवार मारहाण करण्यात आल्याची आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार स्नेहा यांनी दिली होती.

अनिकेत याने लग्न झाल्यापासून त्याचे अनैतिक संबंध लपवून ठेवले होते. तसेच वारंवार ठार मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण, सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन छळ केला यामध्ये सासरे चंद्रशेखर आणि सासू आदिती यांनी देखील त्याला मदत केल्याचा आरोप स्नेहा यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कौटुंबिक हिंसाचाराचा पुण्यात आरोपीचा जबाब घेणे आवश्यक आहे. त्याकरिता त्यांना नोटीस बजावण्यात आली असून जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटिशीद्वारे कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.