Pune News : धक्कादायक! युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथे शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका का झाला याचा शोध पोलीसांकडून घेण्यात येत आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एकनाथ चाटे यांचे चुलत भाऊ साहेबराव धनंजय चाटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी एकनाथ चाटे हे आळे फाटा येथून बेल्हे येथील आपल्या घरी जात होते. यावेळी साहेबराव चाटे यांनी त्यांचा पाठलाग केला आणि अचानक त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यावेळी एकनाथ हे खाली पडले. दरम्यान, त्यांना आणखी दोन व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन उभे असल्याचे दिसले.

डोक्यात वार झाल्याने गंभीर जखमी होऊन एकनाथ खालीच पडले आणि जागेवरच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.