Pune: शिरूर लोकसभेला अजित पवार यांचा उमेदवार कोण?

विलास लांडे, प्रदीप कंद, शिवजीराव आढळराव पाटील, पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज – आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी (Pune)उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवार कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. माजी आमदार विलास लांडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अजित पवार धक्कातंत्राचा वापर करून कोणाला संधी देणार, याची उत्सुकता लागली आहे. 
शिंदे गटाचे अशी ओळख असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील (Pune)यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. त्याला आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांनी जोरदार विरोध केला आहे.

राष्ट्रवादीत आढळरावांना प्रवेश देऊन उमेदवारी दिली तर वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा दिला आहे. दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तर, विरोधी पक्षाकडे उमेदवारच नसल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी कोल्हे यांचा प्रचार सुरू केला आहे. लोकांना भारतीय जनता पक्षा विरोधात पर्याय हवा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
शिरूर लोकसभेला अजित पवार कोणाच्या नावावर सहमती करणार याकडे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. पार्थ पवार यांनीही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन आपण इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे. तर, आपण अजित पवार यांचे ऐकून वारंवार माघार घेतली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रबळ दावेदार असताना कोल्हे यांचा प्रचार केला. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा विलास लांडे यांनी केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.