Pimpri News : भुल थापांना रिक्षा चालक-मालक बळी पडणार नाही – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – गेल्या 10 वर्षांपासून रिक्षा चालकांच्या महामंडळचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. राजकीय फायदा मिळविण्यासाठी महामंडळ करण्याची दिशाभुल केली जात आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर ट्रक टेम्पो बस आणि रिक्षाचे एकत्र जाहीर केलेले महामंडळ हे फसवे असून यातून रिक्षाचालकांचा कोणताही फायदा होणार नाही.

त्यामुळे अशा फसव्या घोषणांना आम्ही बळी पडणार नाही. येणाऱ्या मुंबई, पुणे, पनवेल, नवी मुंबई, कोल्हापूर सह होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतील. रिक्षा चालकांच्या भविष्याविषयी आता आरपारची लढाई सुरू करणार असून दिवाळीनंतर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष  बाबा कांबळे यांनी दिला.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेडच्या वतीने गणपती पुणे रत्नागिरी कोकण येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप झाला. यावेळी रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब ढवळे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत  पुणे शहराध्यक्ष शफिकभाई पटेल उपाध्यक्ष अरशद अन्सारी, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष विजय ढगारे, संजय दौंडकर, जाफरभाई शेख, अनिल शिरसाट, खलील मकानदार, रवींद्र लंके, अजय साळवे, प्रदीप अहीर, सिद्धार्थ साबळे, अमित साळवे, किरण एरंडे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, उपाध्यक्ष मधुरा डांगे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषण करताना बाबा कांबळे यांनी हा इशारा दिला. कांबळे म्हणाले की, 2007 मध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्यामुळे बांधकाम मजूर आणि घरेलू कामगार महिलांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले. परंतु बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळ मध्ये निधी असल्यामुळे आजचे मंडळ बांधकामांना लाभ देत आहे. परंतु घरेलू कामगार मंडळाचे कामकाज मात्र निधीअभावी रखडले आहे. अशीच परिस्थिती रिक्षाचालक मालकाच्या कल्याणकारी मंडळाचे होईल. जरी मंडळ कामगार खात्याच्या अंतर्गत झालं आणि या मंडळास कायमस्वरूपी निधीची तरतूद करण्यात आली नाही तर मात्र त्यांची घोर निराशा आणि फसवणूक होईल. रिक्षाचालक मालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.