Pimpri News : रस्ते, उद्यानांच्या भिंतींवर ग्राफिटी, सुशोभीकरण;  5 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत विकसित केलेले शहरातील रस्ते आणि उद्यानांच्या भिंतींवर काही विशेष संकल्पनांवर आधारित ग्राफिटी वॉल व प्रतिकृतींचा वापर करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात तब्बल 5 कोटी रक्कम गृहीत धरून 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. स्थापत्य विशेष योजनेतील इतर कामांतून ही तरतूद वळविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर घालणे आणि त्यायोगे शहराच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेस साजेसे शहर निर्मितीच्या दृष्टीने सुशोभीकरणाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेमार्फत विकसित केलेल्या रस्त्यांच्या आणि उद्यानांच्या भिंतींवर काही विशेष संकल्पनांवर आधारित ग्राफिटी वॉल व प्रतिकृतींचा वापर करून शहरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या योजनांच्या अनुषंगाने विविध संदेशपर भित्तिचित्रे रंगविण्याची कामे करण्यात येणार आहेत. देशातील विविध राज्यांतील शहरात या संकल्पनेवर आधारित भित्तिचित्रे रंगविण्यात आली आहे. तसेच शिल्प उभारण्यात आली आहेत.

अशा प्रकारची संकल्पना आधारित भित्तिचित्रे रंगविणे तसेच शिल्प उभारणी विविध ठिकाणच्या उड्डाणपुलाच्या स्तंभावर व पुलाखालील रिकाम्या जागेमध्ये करण्यात आल्याचे आढळून येते. ही कामे करण्यासाठी त्या त्या शहरातील महापालिकेने व इतर ठिकाणच्या या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची नेमणूक करून ही कामे करण्यात आली आहेत. अशा प्रकारचे काम करण्यासाठी पुण्यातील सिम्बोयोसिस स्कील युनिव्हर्सिटी, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे बिनाले फाऊंडेशन, दिल्लीतील स्टार इंडिया, सुरत येथील आर्ट जेन (सनी स्कल्पचर्स) आणि ठाण्यातील हस्तांकित फाऊंडेशन या सहा तज्ज्ञ सल्लागारांनी तयारी दर्शविली आहे.

ही कामे करण्यासाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात स्थापत्य विशेष योजनेअंतर्गत नवीन काम म्हणून तब्बल 5 कोटी रक्कम गृहीत धरून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पुलांची व ग्रेडसेपरेटरची स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी असलेल्या 20 कोटी तरतुदींपैकी 30 लाख रुपये आणि स्थापत्य बीआरटीएस विभागाकडील रस्त्यांचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार आवश्यक कामे करण्यासाठी असलेल्या 30 कोटी तरतुदीपैकी 20 लाख रुपये अशी एकूण 50 लाखांची रक्कम भित्तिचित्रे रंगविणे आणि शिल्प उभारणीद्वारे शहराचे सुशोभीकरण करण्यासाठी वळविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.