Sangvi News: एसीबीच्या ट्रॅपमधील उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक निलंबित

एमपीसी न्यूज – तक्रार अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक महिलेने एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 70 हजार रुपये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाद्वारे स्वीकारले. एसीबीने सापळा लावून याप्रकरणी कारवाई केली. यातील उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

काय आहे लाच प्रकरण –

42 वर्षीय तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात अर्ज आला होता. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके यांच्याकडे होती. अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांनी तक्रारदारकडे एक लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून 70 हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली आणि 2 डिसेंबर रोजी सापळा लावला. सोळुंके यांनी सहाय्यक उपनिरीक्षक देसाई यांना लाच घेण्यास पाठवले. लाच घेतल्यानंतर एसीबीचे अधिकारी देसाई यांनी पकडण्यासाठी गेले असता देसाई एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन त्याच्या दुचाकीवरून पळून गेला. एसीबीने उपनिरीक्षक सोळुंके यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्तांनी दोघांना पोलीस सेवेतून निलंबित केले. एसीबीने उपनिरीक्षक महिलेला शुक्रवारी (दि. 3) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.