Pune News: विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, ‘गुड टच – बॅड टच’चे शिक्षण

एमपीसी न्यूज – 7 वी ते 12 वीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. आज विविध शाळांतील 1800 मुली यात सहभागी झाल्या.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून विद्यार्थिंनींसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन बँक – आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना मोफत दरमहा सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी शाळा – महाविद्यालये यांच्याशी समन्वय ठेवण्यात येतो. मुलींची नोंदणी करुन त्यांना ओळख पत्र दिले जाते. दर महिन्याला ओळख पत्र दाखवत, नोंद करुन घेत शाळा – महाविद्यालयातच मुलींना सॅनिटरी पॅड मिळते.

आज झालेल्या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीन बॅंकसाठी नोंदणी करण्यासोबतच मुलींना गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारी विडियो फिल्मही दाखविण्यात आली. यावेळी डॅाक्टरांच्या टीमकडून मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, चांगले आरोग्य राखण्यासाठी काळजी याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले.

All India Brahmin Federation : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी

यावेळी बोलताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “मुलींना योग्य शिक्षण मिळाले तर सक्षमतकडे वाटचाल सुरु राहते. त्यांच्या शिक्षणात, आरोग्यात अडथळे येउ नये यासाठी आयोगाकडून सॅनिटरी नॅपकीन बॅंक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या बॅंकेत मुलींना दरमहा शाळेतच नॅपकीन्स दिले जातात. शालेय शिक्षण सुरु असतानाच त्यांचे आरोग्य जपण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांना उपजत स्पर्शाची जाणीव असतेच पण लहान वयातच याबाबत मुलींना जागरुक, सतर्क केल्यास अनेक गोष्टी रोखता येउ शकतात. मुलींना सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने गुड टच – बॅड टच बाबत विडियो फिल्ममधून शिक्षण देण्यात येत आहे. विविध शाळांमधे मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद आमचा ही उत्साह वाढवणारा आहे.”

आज काका चव्हाण शाळा, धायरी, शिवभूमी शाळा, खेडशिवापूर, महात्मा गांधी विद्यालय, खानापूर, यशवंत विद्यालय, खडकवासला, विमलाबाई नेर्लेकर विद्यालय, रामनगर खडकवाडी या 5 शाळांमधे झालेल्या कार्यक्रमात 1800 मुलींची नॅपकीन बॅंकेत नोंदणी करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.