Semiconductor Shortage : सेमीकंडक्टरचा तुटवडा ! उद्योगावर मोठा परिणाम, सध्यस्थिती काय आहे ?

एमपीसी न्यूज ( प्रमोद यादव ) – कारमध्ये सेमीकंडक्टर चिप नसेल तर तुमची कार व्यवस्थित चालणार नाही. अगदी लॅपटॉप, फोन आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील सुरळीत चालणार नाहीत. सध्या जगात या सेमीकंडक्टर चिपची तुटवडा निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. तुटवड्यामुळे उत्पादनात 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे. चिप्सची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने जगभरातील अनेक ऑटोमोबाईल उत्पादक आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या उत्पादनासह विक्रीवर परिणाम झाला आहे.

सेमीकंडक्टर म्हणजे काय त्याचा कशासाठी उपयोग होतो ?

कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्या मधला तो सेमीकंडक्टर, यामध्ये पी टाईप आणि एन टाईप असे दोन प्रकार आहेत. सेमीकंडक्टर हे वीजेचे उत्तम वाहक असतात, सिलिकॉन पासून ते बनवले जातात. सेमीकंडक्टर मायक्रोसर्किटमध्ये बसवलेले असतात व उपकरणांच्या विस्तृत श्रेणीला ऊर्जा देण्याचे काम करतात. सेमीकंडक्टर शिवाय कार, लॅपटॉप, स्मार्टफोन, घरगुती उपकरणे आणि गेमिंग कन्सोल काम करू शकत नाहित. डिस्प्ले पॉवर पुरवणे, डेटा ट्रान्सफर यासारखी अनेक कार्ये सेमीकंडक्टर करतात. त्यामुळे उद्योगक्षेत्रात त्याचे महत्व अधिक आहे.

सेमीकंडक्टर चिप टंचाई कधीपासून आणि कशामुळे?

सेमीकंडक्टर चिपची टंचाई कोरोना महामारीचा दुष्परिणाम आहे, त्याची सुरूवात 2020 मध्येच झाली. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे वाहन उद्योगाला ब्रेक लागला, अशात वाहन उद्योगाची सेमीकंडक्टर मागणी कमी झाली. तसेच, या काळात वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लॅपटॉप, स्मार्टफोन, घरगुती उपकरणे, गेमिंग आणि इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढल्याने सगळं उत्पादन त्या दिशेने वळविण्यात आले. थोड्या कालावधीनंतर वाहन उद्योग पुन्हा सुरू झाला आणि सेमीकंडक्टरची कमतरता आवासून उभी राहिली.

सेमीकंडक्टर टंचाई आंतरराष्ट्रिय राजकारण देखील कारणीभूत असल्याचे ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विशेषत: अमेरिका आणि चीन या दोन देशातील. अमेरिकेने चीनमधील सर्वात मोठी सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी SMIC यावर निर्बंध घातले. त्यामुळे या कंपनीसोबत जोडल्या गेलेल्या वाहन क्षेत्रातील कंपन्या सेमीकंडक्टर पुरवठ्यासाठी इतर कंपन्यांकडे वळल्या, अचानक मागणी वाढल्याने सर्वांना पुरवठा करणे कंपन्यांना शक्य नाही.

सेमीकंडक्टर चिप बनविण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो !

जगात सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा असण्याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे सेमीकंडक्टर चिप बनविण्यासाठी लागणारा वेळ. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार एक सेमीकंडक्टर चिप बनविण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो किंवा त्यापेक्षा जास्त. त्यासाठी भव्य फॅक्टरी, धुळमुक्त खोल्या, महागड्या मशीन, टीन व लेझर यांची आवश्यकता असते. तसेच ज्या ठिकाणी हि चिप बनवली जाते त्याठिकाणी देखील त्याचा वापर होतो. त्यामुळे उत्पादन वाढवले तरी परिस्थिती पूर्वपदावर यायला 2023 उजाडेल असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

तैवान सेमीकंडक्टर मैन्यूफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (TSMC) देशातील सर्वात मोठी चीप बनवणारी कंपनी आहे. क्लाकॉम, निविडीया, अॅपल हे त्यांचे ग्राहक आहेत. कोरोना काळात ईलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर झालेली विक्री देखील चीप तुटवड्याला कारणीभूत असल्याचे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलय.

उद्योगावर कसा परिणाम होतोय ?

चिप्सची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने जगभरातील अनेक ऑटोमोबाईल उत्पादक आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या उत्पादनासह विक्रीवर परिणाम झाला आहे. कार खरेदीसाठी सरासरी पाच ते सहा महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. तसेच ग्राहकांची मागणी, उपलब्ध सेमीकंडक्टर चिप याचा अंदाज बांधूनच उत्पादन आणि पुरवठा केला जात असल्याचे पिंपरीतील एका नामांकिंत कार शोरूमच्या व्यवस्थापक यांनी सांगितले. अगोदर शोरूममध्ये फिरता स्टॉक असायचा तो सध्या उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

चाकण मधील एका नामाकिंत कंपनीतील प्रोडक्शन इंजिनिअर म्हणाले, ‘चिप तुटवड्यामुळे उत्पादनात 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने प्रोडक्शन लाईन बंद ठेवाव्या लागत आहेत.’

पिंपरी चिंचवड लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दिपक फल्ले म्हणाले, ‘चिप तुटवड्यामुळे उत्पादनात घट झालीय त्यामुळे विक्रीवर देखील परिणाम झाला आहे. महागड्या गाड्या घ्यायच्या तर सात ते आठ महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. त्यामुळे ग्राहकाची मानसिकता बदलत असून, ती दुसरी वस्तू घेण्याकडे परावर्तित होत आहे. तसेच, कोरोनाचा हाहाकार किती काळ सुरू राहिलं हे अनिश्चित असल्याने परिस्थिती पूर्वपदावर यायला अजून थोडा लागेल.’

परिस्थिती पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल ?

सेमीकंडक्टर चिप तुटवडा असला तरी त्वरित उत्पादन आणि पुरवठा साखळी पूर्ववत होणार नाही. सेमीकंडक्टर निर्मिती ही किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक बाब आहे. एक सेमीकंडक्टर चिप बनविण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे उत्पादन वाढवले तरी परिस्थिती पूर्वपदावर यायला 2023 उजाडेल असे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भारत सरकारतर्फे एक ‘मास्टर प्लॅन’ बनवण्यात आला असून, सेमिकंडक्टर चिप, डिस्प्ले बोर्डच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI (Production Linked Incentive) ही योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत आगामी 5 ते 6 वर्षांत 10 बिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास 76,000 करोड रुपये) गुंतवण्याची योजना आखण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.