Talegaon Dabhade News : कचरा डेपोला सीमाभिंत नसल्याने कचरा शेतक-यांच्या शेतात 

कचरा गाड्या अडवून आंदोलन करण्याचा शेतक-यांचा इशारा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा डेपोला सीमाभिंत नसल्याने रोजचा जमा होणारा कचरा थेट आजूबाजूच्या शेतक-यांच्या शेतात जात आहे. तसेच शेतात जाणा-या रस्त्यावर देखील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. कचरा डेपोला सीमाभिंत घालावी तसेच शेतात जाणारे रस्ते मोकळे करावे अशा मागण्या शेतक-यांनी केल्या आहेत. अन्यथा कच-याच्या गाड्या अडवून आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

तळेगाव शहर व स्टेशन विभागातून दररोज 20 टन  ओला – सुका कचरा गोळा केला जातो. तो घंटागाड्यांच्याव्दारे मोरखळा येथील नवीन कचरा डेपोवर आणून टाकला जातो. आरोग्य विभाग प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्यातील काही कचरा गाडया शेतक-यांच्या शेतावर जाणा-या रस्त्यावर खाली केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड होऊन बसले आहे.

या बाबत नगरपरिषदेतील सभागृह नेते व माजी आरोग्य समिती सभापती अरुण भेगडे पाटील यांनी सांगितले कि शहरातून कचरा जास्त जमा होत असल्याने  तो नवीन कचरा डेपो मध्ये टाकला जात आहे. त्या डेपोला सीमा भिंत नसल्यामुळे त्या कचा-यातील प्लास्टिक व इतर कचरा आजूबाजूच्या शेतक-यांच्या शेतात जात आहे. तसेच काही कचरा गाड्यातील कचरा रस्त्यावर टाकल्याने शेतावर जाता- येताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.आणि येण्याजाण्याची अडचण शेतक-यांना होत आहे.

याबाबत स्थानिक शेतक-यांनी  अनेक वेळा पदाधिकारी आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील त्याची दाखल घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेतक-यांच्या शेतात नगर परिषदेचा कचरा जात असल्याने त्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. त्याची भरपाई मिळावी. तसेच शेतक-यांचा येण्याजाण्याचा रस्ता मोकळा करावा,सिमाभिंत घालावी आदि मागण्या शेतक-यानी  केल्या आहेत.अन्यथा लोकशाही मार्गाने कचरा गाड्या बंद आंदोलन केले जाईल.असा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.