Talegaon Dabhade News : डॉ. श्रीहरी डांगे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज – एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून मावळातील तळेगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीहरी डांगे यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

डॉ. डांगे यांचे तळेगाव दाभाडे येथे श्री डायग्नोस्टिक सेंटर आहे. डॉ. डांगे आणि त्यांच्या पत्नी ते डायग्नोस्टिक सेंटर चालवतात. व्यवसायाची गरज म्हणून डॉ. डांगे यांना एमआरआय मशीनची गरज होती. त्यासाठी मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीशी त्यांनी संपर्क साधला.

कंपनीने डॉ. डांगे यांना एमआरआय मशीनचे कोटेशन पाठवले आणि दोन कोटी चार लाख रुपये आगाऊ मागितले. डॉ. डांगे यांनी सर्व रक्कम आगाऊ दिली. तरीही मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीचे भागीदार तुलसी पितांबरदास मनेक, नीरव हसमुखराय पंचमाटिया, जर्नल सिंग प्रेमसिंग बावा, इम्तियाज अकबर अली पोरबंदरवाला, डॉ. मेघा निरव पंचमाटिया (सर्व रा. मुंबई) यांनी एमआरआय मशीन पाठवली नाही.

याबाबत डॉ. डांगे यांनी चौकशी केली असता सर्व भागीदार मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) ही कंपनी अन्य व्यक्तीला विकून पसार झाले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरोपींकडे पैसे मागितले. त्यातील भागीदार जर्नलसिंग प्रेमसिंग बावा याने डॉ. डांगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतरही पोलिसांकडून अद्यापि कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी डॉ. डांगे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी संबंधितांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.