Talegaon News : धक्कादायक! प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूनंतरही हेळसांड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे मधील बनेश्वर स्मशानभूमीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. शवदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह दिल्यानंतर शवदाहिनीतील गॅस संपला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार पूर्ण झालेच नाहीत. हा धक्कादायक प्रकार दोन दिवसानंतर नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी गेले असता उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे शहरातील बनेश्वर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे. प्रदूषण आणि इतर समस्यांना फाटा देण्यासाठी प्रशासनाने ही सोय केली आहे. अनेक शहरांमध्ये गॅस शवदाहिनी आहेत. मात्र त्या सुस्थितीत ठेवणे देखील प्रशासनाचे काम आहे. शवदाहिनी बसविल्यानंतर ठराविक कालावधीनंतर तिची दुरुस्ती, देखभाल करणे आवश्यक आहे. ही देखभाल व दुरुस्ती बनेश्वर स्मशान भूमीतील गॅस शवदाहिनी बाबत होताना दिसत नाही.

मागील आठवड्यात तळेगाव दाभाडे येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी दिला. गॅस शवदाहिनीमध्ये मृतदेह गेल्यानंतर शवदाहिनीचा गॅस अचानक संपला. ही बाब तिथल्या लोकांच्या लक्षात आलीच नाही. स्मशानभूमीत कर्तव्यावर असलेल्या लोकांना देखील याचा थांग लागला नाही.

नातेवाईक तिस-या दिवशी सावडण्यासाठी (अस्थी जमा करणे) सकाळी स्मशानभूमीत आले. तिथे आल्यानंतर नातेवाईकांना धक्का बसला. कारण त्यांच्या मयत नातेवाईकावर पूर्णपणे अंत्यसंस्कार झालेच नव्हते. गॅस संपल्याने शवदाहिनी बंद पडली आणि अर्धवट जळालेला मृतदेह तसाच राहिला. सावडण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांनी तिस-या दिवशी पुन्हा मयत व्यक्तीवर लाकडी चिता रचून अंत्यसंस्कार केले.

घरातील, नात्यातील व्यक्तीचे निधन झाल्याने सर्वजण दुःखात असतात. प्रशासनाची उदासीनता नागरिकांना आणखी दुःखात ढकलत आहे. प्रशासनाने अशा बाबींकडे लक्ष द्यावे, अशी याचना नागरिक करीत आहेत.

पिंपरी चिंचवड भाजपचे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला असता त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. नागरिकांना असा अनुभव पुन्हा न येण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहायला हवे, असे कुलकर्णी म्हणाले.

 

दरम्यान, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे म्हणाले, बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी जुनी झाली आहे. तिचे संचालन करण्यासाठी एक एजन्सी नेमली आहे. शवदाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील आठवड्यात ती बंद पडली होती. मात्र हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पुढील कार्यवाही केली आहे. नवीन शवदाहिनी येत्या काही दिवसात येणार आहे. ती आल्यानंतर जुनी शवदाहिनी दुरुस्तीसाठी पाठवली जाणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.