Tanmayee Desai : पिंपरी चिंचवडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा! तन्मयी देसाईची युपीएससी परिक्षेत बाजी

एमपीसी न्यूज – देशभरात आज युपीएससी 2021 परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या युपीएससीच्या परिक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून सुद्धा ही विजयी पताका झळकली. निगडी प्राधिकरण एल आय सी येथे राहणाऱ्या तन्मयी देसाई  (Tanmayee Desai) या तरुणीने युपीएससी परिक्षेत 224 वा नंबर मिळवत पिंपरी चिंचवडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी 2007 सालच्या युपीएससी परीक्षेत संकेत भोंडवे याने सुद्धा अशा प्रकारे यश मिळवत शहराची मान गौरवाने उंचावली होती.

मिळालेले हे यश नक्कीच मोठे आहे, विश्वास बसत नाही, पण खूप चांगलं वाटतंय अशा शब्दात तन्मयीने आपला आनंद व्यक्त केला आहे. अपयशाने खचून न जाता जोमाने ध्येयाला गवसणी घालणाऱ्या तन्मयीचा खडतर प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणा देणारा असाच आहे. तन्मयीच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यांचे हे मुलीने आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने तन्मयीच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.

युपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल बोलताना तन्मयी म्हणाली, आजच्या यशाबद्दल खूप छान वाटतंय. रॅंक मोठा मिळावा असे वाटत होते पण हे मिळालेले यश सुद्धा मोठं आहे, तरीही सर्विस अपग्रेडेशन साठी मी प्रयत्न करणार असल्याचे तन्मयी (Tanmayee Desai) आवर्जून म्हणाली.

तन्मयीचे शालेय शिक्षण निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून पुर्ण झाले. दरम्यान, दहावीत उत्तम गुण असूनही तन्मयीने आर्ट्सकडे वळायचे ठरवले. सायकाॅलाॅजीमध्ये तिला आवड निर्माण झाली आणि पुढे पदवीचे शिक्षण फर्ग्यूसन आणि पदव्युत्तर शिक्षण क्राइस्ट बेंगलोर येथून पूर्ण केले. त्यानंतर काही काळ विश्वकर्मा इंस्टिट्यूट येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली. शालेय जीवनापासूनच सीव्हिल सर्विसकडे आकर्षिल्या गेलेल्या तन्मयीने पदव्युत्तर शिक्षणानंतर निश्चयाने युपीएससीसाठी तयारी सुरू केली.

दरम्यान, पहिली युपीएससीची परीक्षा दिली तेव्हा तिला अपयश मिळाले परंतु खचून न जाता स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासिका येथे जोमाने स्वतःच अभ्यास करत दुसऱ्यांदा परीक्षेला सामोरी गेली मात्र यावेळी तन्मयीने नोकरी सोडली आणि पुर्ण वेळ अभ्यासासाठी दिला.

9 मे रोजी मुलाखत पार पडली आणि आज (सोमवार) परिक्षेचा निकाल जाहीर झाला. कुटुंबातील कोणालाच विश्वास बसत नव्हता म्हणून पुन्हा एकदा वेबसाईट चेक केली आणि 224 वा नंबर आल्याची खात्री झाली. यानंतर मात्र कुटुंबातील सगळ्यांनीच एकमेकांचे तोंड गोड करत आनंद व्यक्त केला.

दरम्यान तन्मयी (Tanmayee Desai)  परीक्षेच्या यशाची गुरूकिल्ली सांगताना म्हणाली, सेल्फ स्टडी महत्त्वाचा आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा इतर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या, समजून घ्या. कठीण काहीच नाही. कायम आपण अॅक्टिव राहणं महत्त्वाचं, यश आपोआपच मिळेल.

पुढे तन्मयी म्हणाली, अपयशाने खचून जाणाऱ्यांना मला काही सांगायचे आहे. आज भले सगळ्यांचा नंबर आलेला नाही, ते पुन्हा जिथे सुरूवात केली होती तिथेच उभे आहेत, म्हणून खचून जायची गरज नाही. पुढे जाताना नेहमी प्रत्येकाला तर्कशुद्ध विश्लेषण करता आलेच पाहिजे. एकदा अपयश आले म्हणून सगळंच संपलं असे म्हणता येणार नाही. पुन्हा जोमाने तयारीला लागा, यश तुम्हाला नक्की मिळेल. 

दरम्यान, युपीएससी परिक्षेेत मोठे यश संपादन केल्यामुळे तन्मयीवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तर घरची मंडळी मुलीने विश्वास सार्थ ठरवला म्हणून आनंदोत्सव साजरा करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.