Sangvi News : सांगवी परिसरात आणखी सात श्वानांचे मृतदेह आढळले

एमपीसी न्यूज : पाळीव तसेच भटक्या श्वानांवर हल्ले आणि अत्याचाराचे प्रकार सुरूच आहेत. सांगवीतील सृष्टी चाैक परिसरात मंगळवारी (दि. 5) सकाळी सात श्वान मृतावस्थेत आढळून आले. सांगवीत सलग तीन दिवसांपासून उघडकीस आलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 19 श्वानांचा जीव गेला आहे.

सांगवी येथील स्ट्रे डाॅग्स फिडर या प्राणीप्रेमी ग्रुपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात अज्ञातांकडून भटक्या श्वानांचा छळ करण्यात येत आहे. त्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा करण्यात येत आहे. त्यामुळे श्वान दगावण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मंगळवारीही सकाळी साडेआठच्या सुमारास अशाच पद्धतीने सात श्वान सृष्टी चाैकात मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

दरम्यान, रविवारी दगावलेल्या श्वानांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. विषबाधेमुळे त्या श्वानांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले असून त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. जीवे मारण्याच्या हेतूने श्वानांना खाद्यपदार्थांमधून विषबाधा केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्ट्रे डाॅग्स फिडर या प्राणीप्रेमी ग्रुपकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.