Pune News : महिला डॉक्‍टरने कॅन्सर झाल्याचे सांगत रुग्णाला घातला दीड कोटीचा गंडा 

एमपीसी न्यूज : एका महिला डॉक्‍टरने महिला रुग्णाला कॅन्सर झाल्याचे सांगत तब्बल दीड कोटीला गंडा घातला. उपचारासाठी रुग्णाने पगारातून केलेली बचत, प्रॉव्हिडंट फंट, मुदत ठेवी, पोस्टातील ठेवी, घरभाडे तसेच पतीच्या व्यवसायातून बचतीतील सर्व पैसे डॉक्‍टरला दिले. यानंतरही डॉक्‍टरने पैशाचा तगादा लावल्यावर रुग्ण महिलेच्या पतीने डॉक्‍टरच्या उपचाराचा भांडाफोड केला. याप्रकरणी संबधीत महिला डॉक्‍टरवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

डॉ.विद्या धनंजय गोद्रस (रा.वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष जाधव (58,रा.वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीकडून 1 कोटी 47 लाख 58 हजार रुपये घेण्यात आले आहेत.

फिर्यादी सुषमा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या संरक्षण खात्यात ऑडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एका मैत्रीणीमार्फत डॉ. विद्या यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान सुषमा यांनी अर्धशिसी व गुडघेदुखीवर 2017 मध्ये डॉ. विद्या यांच्याकडे उपचार घेतले होते. तर 2019 मध्ये त्यांना अन्ननलिकेचा त्रास होत असल्याने त्यांनी डॉ. विद्या यांच्याकडे संपर्क साधला होता.

यावेळी विद्या यांनी आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदीक संस्थेची फ्रेंचाईजी घेतली असून त्याचा शहरातील अनेक रुग्णांना लाभ झाला असल्याचे सांगितले. सुषमा यांना व्हॉटसअपवर नाभिचा फोटो पाठवायला सांगितला होता. तो फोटो कॅनडातील संस्थेकडे पाठवून रिपोर्टमध्ये लिव्हर असायटीस झाल्याचे सांगितले. रुग्णाला अथवा कुटुंबीयांना रिपोर्ट गोपनीय असल्याने पूर्ण बरे होईपर्यंत दाखवत येत नसल्याचे सांगत उपचार सुरु करण्यास सांगितले. लवकर उपचार सुरु न केल्यास मृत्यू होऊ शकतो, अशी भीतीही घातली.

यामुळे घाबरलेल्या सुषमा यांनी तातडीने पैसे भरत उपचार सुरु केले. यानंतर सुषमा यांना औषधाची चिठ्ठी व रिपोर्ट न देता फक्त गोळ्या देण्यात येत होत्या. यानंतर 2020 मध्ये पुन्हा नाभिचा फोटो पाठवायला सांगून लिव्हरच्या वरच्या भागात कॅन्सरची गाठ आल्याचे सांगितले. यासाठी सात लाख रुपये आगाऊ मागितले. मात्र सुषमा यांच्याकडील सर्व पैसे संपल्याने त्यांनी पतीकडे पैसे मागितले.

पतीने पैशाबाबत विचारणा केली असता, सुषमा यांनी उपचाराबाबत माहिती दिली. पतीने आजाराची कागदपत्रे व रिपोर्ट मागितले असता डॉ. विद्या यांनी ते दिले नाहीत. यामुळे त्यांचा संशय बळावल्याने सुषमा यांच्या पतीने एका वकिलासह डॉ. विद्या यांची भेट घेतली. यावेळी डॉ. विद्या यांनी आजार बरा झाल्याशिवाय रिपोर्ट देता येत नसल्याचे सांगितले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.