Weather Update : राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यावर सध्या पावसाचं आभाळ घोंघावताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील हवेच्या हालचालीमुळं सध्या महाराष्ट्रातील मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून तामिळनाडूला पावसाचा जोर कायम आहे. तामिळनाडूमध्ये जोरदार पावसानं तेथील जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामानाच्या अचानक बदलामुळं आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात सध्या पाऊस पडण्याचा अधिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पाऊस पडण्याच्या शक्यतेनुसार जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि रेड अलर्टमध्ये विभागण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या हवामान बदलताना सुद्धा पहायला मिळत आहे. वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 प्रतिकिमी असण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.