Nigdi News : नाट्यगृहाचे काम आठ वर्षांत 37 कोटींवरून 70 कोटींवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी- प्राधिकरणातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी सन 2013 मध्ये ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने 800 प्रेक्षकक्षमता असलेले नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, आठ वर्षात या नाट्यगृहाचे काम 37 कोटींवरून 70 कोटींवर पोहोचले. आता या नाट्यगृहातील विद्युतकामांवर सव्वासात कोटी खर्च करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी -प्राधिकरणात ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने 800 प्रेक्षकांची बैठकव्यवस्था असलेले उत्तम प्रतीचे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. पेठ क्रमांक 26 मधील 5 हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभे केले जात आहे. या नाट्यगृहामध्ये 220 प्रेक्षकक्षमता असलेले एक लहान सभागृह, 110 बैठकव्यवस्था असलेले कॉन्फरन्स हॉल आणि कलादालन तसेच 12 निवासी खोल्या बांधण्याचे नियोजन आहे. नाट्यगृहात आधुनिक पद्धतीने विद्युतव्यवस्था करणे, ध्वनीव्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

नागरिकांसाठी रेस्टॉरंटची सोयही करण्यात येणार आहे. सध्या फ्लोअरिंग, विद्युतविषयक कामे, इंटेरिअर अशी अंतर्गत कामे सुरू आहेत. कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया, निवासी खोल्यांचे आणि बाह्य सजावटीचे कामही अर्धवट आहे. या नाट्यगृहाच्या कामाला सन 2013 मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी 37 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यानंतर हा खर्च 70 कोटींवर पोहोचला आहे.

नाट्यगृहाचे काम सुरुवातीपासून संथगतीने सुरू आहे. या नाट्यगृहातील आवश्यक साऊंड सिस्टिम उदवाहक यंत्रणा, स्टेज लाईटिंग, फायर फाइंटिंग आणि फायर अलार्म सिस्टिम, वातानुकूलित यंत्रणा आणि परिसरातील स्ट्रीट लाइंट सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी 6 कोटी 70 लाख 93 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र, तीन वेळा निविदा मागवूनही एस अॅण्ड जे बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराची एकच निविदा सादर झाली. त्यांनी निविदा दरापेक्षा 8.99  टक्के जादा दर सादर केला. त्यांना सव्वासात कोटींचे हे काम देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.