Chinchwad News : हे शहर की चोरीचा अड्डा; दरोड्याच्या घटनांमध्ये दुप्पट तर जबरी चोरीच्या गुन्ह्यात दुपटीहून अधिक वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर हे चोरट्यांचा अड्डा बनत चालले आहे. कोरोना काळात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये दुप्पट तर जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर घरफोडी आणि इतर चोऱ्यांचे देखील प्रमाण वाढले आहे.

रात्रीच्या वेळी चोरी, दरोड्याच्या घटना सर्वाधिक घडतात. रात्रीच्या वेळी गुन्हे घडू नये, परिसरात शांतता राहावी, यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ग्रामसुरक्षा दलाची सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने समाजाच्या सुरक्षेसाठी समाजातील काही प्रतिनिधींचा पोलीस गस्तीसाठी समावेश करून अधिक चांगली गस्त घालणे हा ग्रामसुरक्षा दलाच्या सुरुवातीमागे उद्देश आहे. ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना देखील गुन्हे घडतच आहेत. किंबहुना त्यामध्ये वाढ होत आहे.

पिंपरी मार्केट, पिंपरी भाजी मंडई आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांच्या मदतीने मोबाईल फोन, सोनसाखळी चोरीचे प्रकार घडत असल्याचे आरोप नागरिकांमधून केले जातात. मोबाईल फोन, सोनसाखळी चोरीच्या काही घटना पोलीस दप्तरी दाखल देखील होत नसल्याचे नागरिकांनी म्हणून बोलले जात आहे. त्यातच जे गुन्हे दाखल होत आहेत त्यांची उकल करण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे.

या वर्षीच्या मे महिन्यात दरोड्याच्या दोन घटना घडल्या. तर जानेवारी ते मे 2021 या पाच महिन्यांच्या कालावधीत 20 दरोडे पोलीस दप्तरी दाखल आहेत. हे प्रमाण मागील वर्षी जानेवारी ते मे 2020 या कालावधीत दहा एवढे होते. वरील पाच महिन्यांच्या कालावधीत यावर्षी जबरी चोरीच्या 123 घटना घडल्या. त्यातील 79 घटना उघडकीस आल्या आहेत. जबरी चोरीच्या घटनांचे  प्रमाण मागील वर्षी 55 एवढे होते.

जानेवारी ते मे 2021 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात 123 घरफोड्या झाल्या. त्यातील केवळ 48 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. हे प्रमाण 39 टक्के एवढे आहे. मागील वर्षी घरफोड्यांच्या गुन्ह्यांचे उघडकीस येण्याचे प्रमाण 42 टक्के होते. वाहन चोरी आणि इतर  चोरीचे 766 गुन्हे पाच महिन्यात दाखल झाले. त्यातील केवळ 197 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. हे प्रमाण केवळ 26 टक्के एवढे आहे.

गुन्हे दाखल होण्याचे वाढत चाललेले आकडे आणि गुन्हे उघडकीस येण्याचे कमी होणारे प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. पुढील काळात असे गुन्हे घडू नयेत यासाठी, तसेच घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.