Talegaon Crime News : जी पी पारसिक सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पंजाबमधील टोळीला बेड्या

एमपीसी न्यूज – चाकण – तळेगाव रोडवर असलेल्या जी पी पारसिक सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी सव्वाआठ वाजता घडली. पोलिसांनी पंजाब येथील टोळीच्या तिघांना अटक केली आहे.

लखवीरसिंग बलदेवसिंग (वय 27, रा. रायखाना, ता. गोडमंडी, जि. बढेडा, पंजाब), रमेशकुमार लाजपत्राय चावला, वय 48, रा. परसराम नगर, जि. बढेडा, पंजाब), सिंधरसिंग मख्खनसिंग गगू (वय 34, रा. चंदसर बस्ती, जि. बढेडा, पंजाब) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बालाजी रामराव सुडे (वय 63, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर तळेगाव स्टेशन येथे जी पी पारसिक सहकारी बँक आहे. त्या बँकेच्या शेजारी बँकेचे एटीएम आहे. आरोपी लखवीरसिंग याने एटीएम सेंटरमध्ये घुसून स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दोन साथीदारांनी त्याला मदत केली. हा प्रकार बँकेच्या लक्षात आल्याने लगेच पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी आरोपींना जागीच पकडले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.